• Mon. Nov 18th, 2024

    शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2024
    शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस

    ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरू होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षान्त समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.19) वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    दीक्षान्त समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, जैन विश्वभारती विद्यापीठाचे कुलपती तथा केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, विद्यापीठाचे कुलगुरू बच्छराज दुगड, जैन विश्वभारतीचे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू-साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.

    जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा व सामोपचाराचा पुरस्कार केला आहे, असे सांगून, जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या व आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमानआचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.

    संस्कार व मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे मेघवाल यांनी यावेळी सांगितले. जैन विश्वभारती विद्यापीठाने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

    आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र

    मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्त्व आहे व ज्ञानाइतकी  दुसरी पवित्र गोष्ट नाही.  यासाठी स्नातकांनी ज्ञानासाठी समर्पित व्हावे असे आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले.

    ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग व आळस हे मुख्य अडथळे आहेत असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदी गुणांचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन (के. व्ही.) कामत तसेच वेद व जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा.दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विविध विद्याशाखांमधील पीएच. डी. स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed