• Sun. Sep 22nd, 2024

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी – उद्योगमंत्री उदय सामंत

ByMH LIVE NEWS

Feb 18, 2024
‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी – उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे दि.१८: संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्‍ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची श्री. सामंत यांनी पाहणी केली. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, गणेश निबे, किशोर धारिया, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर  येथे २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रास्त्रांविषयी कुतूहल असते. त्यांना आधुनिक शास्त्रासोबत संरक्षण साहित्य जवळून पाहण्याची ही संधी आहे.

संरक्षण अभियांत्रिकी उद्योगांनाही प्रदर्शनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्स आणि इतर उद्योगांना उद्योग विस्तार आणि या क्षेत्रातील संधीविषयी प्रदर्शनातून माहिती मिळणार असल्याने उद्योग क्षेत्राशी निगडित प्रतिनिधींनी प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी केले.

प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या  एमएसएमईना निःशुल्क दालन उपलब्ध करून द्यावे. सर्व उद्योग संघटनांच्या बैठका घेऊन त्यांना आमंत्रित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रदर्शनातील चार दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील १ लाखाहून अधिक विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देणार आहे. त्यांना १ हजार प्रकारचे तंत्रज्ञान पाहण्यासोबत भारतीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed