• Sat. Sep 21st, 2024

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम; पंधरवड्यात एक लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

ByMH LIVE NEWS

Feb 18, 2024
सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम; पंधरवड्यात एक लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

मुंबई , दि. 18 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

या मोहिमेंतर्गत 1 लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 23 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे  नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

सन 2022-23 मध्ये राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर ‘विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या  उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed