• Sat. Sep 21st, 2024

पालकांनो, टीनएजर्सकडे दुर्लक्ष नकोच…; व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणे, जीवन संपवण्याच्या घटना वाढल्यात

पालकांनो, टीनएजर्सकडे दुर्लक्ष नकोच…; व्यसनाधीनता, प्रेमप्रकरणे, जीवन संपवण्याच्या घटना वाढल्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मोबाइल, सोशल मीडिया, टीव्ही, इंटरनेटचा होणारा वापर आणि इतर अनेक कारणांमुळे सध्याची पिढी पालकांपासून दूर गेली आहे. गेल्या दहा वर्षांत १३ ते १८ वयोगटातील मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण, व्यसनाधिनता, नैराश्य आणि त्यातून आत्महत्येचे वाढणारे प्रमाण चिंताजनक असून, यामध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे टिनेजर्सकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

सिगारेटच्या अमलाखालील एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीच्या कृत्यामुळे ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आली. शाळेच्या इमारतीवरून उडी घेत या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमधील एका शाळेत नुकतीच घडली. याबाबत ‘मटा’शी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस म्हणाले, अनेकदा मुलांनी केलेल्या चुकांची समजूत काढताना पालक, शिक्षक आणि समाज त्यांना हीन वागणूक देतात. फार मोठी चूक केल्याची भावना सातत्याने मुलांच्या मनात बिंबवली जाते. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. यातूनच मुले नैराश्य किंवा व्यसनाधिनतेकडे वळतात. सोशल मीडिया, इंटरनेट आणि करोनानंतर मोबाइलचा वाढलेला वापर यामुळे मुलांची मानसिक वाढ आगोदरच कमी झाली आहे. अशातच शाळा आणि घर दोन्हींकडून मिळणारी गुन्हेगारासारखी वागणूक मुलांच्या वाढीसाठी घातक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संवादाचा पूल गरजेचा

याप्रसंगी बोलताना समुपदेशक ज्योत्स्ना डगळे म्हणाल्या, सध्याची वाढत चाललेली विभाजीत कुटुंब पद्धती आणि आई-वडिलांकडे मुलांसाठी नसलेला वेळ यामुळे मुले एकटी पडली आहेत. अनेकदा मुलं काय करतात, याची माहिती पालकांना नसते. घरातून होणारा विश्वासाचा संवाद कमी झाल्याने मुले बाहेर त्याची उत्तरे शोधतात. यातूनच गैरमार्गाला जाण्यासारखे प्रकर पुढे येतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्रीपूर्वक संवादाचा पूल बांधावा, असेही त्या म्हणाल्या.
कौटुंबिक हिंसाचारात वाढ, पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहितांचे छळ, गेल्या वर्षात २९२ गुन्हे दाखल
तज्ज्ञ सांगतात…

दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये व्यसनाधिनता, प्रेमप्रकरण, नैराश्य व त्यातून आत्महत्येचे प्रयत्न या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण दहा ते वीस टक्के होते. आता हेच प्रमाण ५० टक्क्यांवर गेले आहे. याचबरोबर पूर्वी दहापैकी केवळ दोन प्रेमप्रकरणे समोर येत. मात्र, आता हेच प्रमाण दहापैकी आठवर पोहोचले आहे. तसेच ५ टक्क्यांहूनही कमी असलेले आत्महत्येच्या घटनांत चिंताजनक वाढ झाली असून, सध्या ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे नैराश्य आणि आत्महत्येच्या घटनांची असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांचा सल्ला
– मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा
– मुलांना शिस्त लावा पण संतुलित पद्धतीने
– घर आणि शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त चर्चा व्हाव्यात
– मुलांना क्वालिटी टाइम द्या
– मुलांचा निसर्गाशी संपर्क वाढवा
– आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे
– शाळांसह पालकांचीही मोठी जबाबदारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed