• Sat. Sep 21st, 2024
वाहनाचा कट लागला म्हणून वाद, रागाच्या भरात बेदम मारहाण, तरुणाची हत्या; आई-वडिलांचा आक्रोश

अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनाचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन अकोला जिल्ह्यात लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन तरुणाची हत्या करण्यात आली आहे. देवानंद उत्तम तायडे (वय २८) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. हिवरखेड पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून मारेकरांना शोध शोध आणि पुढील कारवाई सुरु आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापुर गावात काल शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात असताना त्याच्या वाहनाचा कट रस्त्याच्या उभ्या असलेल्या काही जणांना लागला. यावरुन चांगलाच वाद पेटला आणि हा वाद हत्येच्या टोकापर्यंत पोहोचला. दरम्यान, वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्याप्रमाणात शिवीगाळही झाली. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने मारहाण केली. या हल्ल्यात तो जखमी झाला. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेच्या नंतर देवानंदचे मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले.
…तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी! रामदास कदमांचं थेट आव्हान
या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय पाठवण्यात आला आहे. सद्यस्थित मृतदेहाची वैद्यकीय तपासणी सुरू असून या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मारेकरांचा शोध सुरू आहे. लवकरच देवानंदच्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असंही गोविंद पांडव यांनी सांगितलं आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचं एक पथक नेमण्यात आल्याचं ते म्हटले आहे. वाहनाचा कट लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरुन देवानंदची हत्या झाली असून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed