• Sat. Sep 21st, 2024
एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं ठाकरे गट रोखू शकत नाही, भरत गोगावले यांचं वक्तव्य

कोल्हापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चालणं बोलणं वागणं हे उबाठावाले रोखू शकत नाहीत. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची नियत आणि नीतिमत्ता साफ आहे, तोपर्यत उबाठावाले येऊ द्या, अन्यथा आडवा येऊ द्या. या सर्वांना एकनाथ शिंदे पार करून जातील हे श्री महालक्ष्मी समोर उभे राहून सांगतो, असे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. तसेच त्यांनी काल झालेल्या भास्करराव जाधव आणि राणे यांच्यातील राड्यावरून देखील भाष्य केले असून जे काही घडलं ते बरोबर नाही. मात्र हे कशामुळे आणि का घडलं याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे ही म्हटले आहे.

कोल्हापूरात शिवसेनेच्या महाअधिवेशनानिमित्त सर्व आमदार, खासदार, मंत्री गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात आहेत. दरम्यान आज शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आज कोल्हापुरात होणारी सभा ही भव्य दिव्य होणार असून या सभेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. या सभेनंतर महाअधिवेशनाची सांगता होईल असे म्हणाले आहेत. दरम्यान सभेस्थळी शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र याला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देत शिंदे गटाला डिवचण्याना प्रयत्न करण्यात आला आहे.
घरात चर्चा करूनच निर्णय, नांदेडच्या विकासासाठी साहेब भाजपमध्ये, अमिता चव्हाणांची स्पष्टोक्ती
सभास्थळापासून काही अंतरावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांच्या कार्यालय परिसरात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. याला देखील गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाच्या सभा होतात तेव्हा आम्ही ही पोस्टर बाजी करू शकतो. मात्र आम्ही कसलीही पोस्टरबाजी करत नाही. तुमचे मुख्यमंत्री होतील तेव्हा तुम्ही देखील पोस्टर लावा, अगदी घराघरावर पोस्टर लावा, आम्ही कोणाला रोखणार नाही. मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा मोठी होत आहे हे पाहून बहुतेक सभेला दृष्ट लागावी, यासाठी ठाकरे गट असा प्रयत्न करत असावा, असे गोगावले म्हणाले आहेत.

तर काल भाजपचे राणे आणि ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव या दोघांमध्ये झालेल्या राडा संदर्भात देखील त्यांनी आपले प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले म्हणाले की, कोणत्या सरकारला वाटतं की त्यांच्या राज्यात भानगडी व्हाव्यात. मात्र काल जे काही घडलं ते बरोबर नाही. हे कशामुळे आणि का घडलं यांची चौकशी होणे गरजेचे आहे. सभा घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र बोलण्यामध्ये प्रत्येकाने प्रमाण राखले पाहिजे. शब्द हे शस्त्र आहेत. शब्द जपून वापरला तर तुम्हाला कोणी काही बोलत नाही. मात्र तुम्ही कोणाच्या अंगावर जात शिव्या दिल्या तर समोरचा देखील त्याच पद्धतीने उत्तर देईल. काल घडलेल्या राड्यात देखील आरेला का रे म्हणून उत्तर दिल्याने हा प्रकार घडला असावा असे गोगावले म्हणाले आहेत.

अभिनय करणारे न्यायाधीश, वकील आणि राहुल नार्वेकर यांची अभिव्यक्ती अराजकता माजवणारी | असीम सरोदे

ते पुढे म्हणाले की, आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी येत्या २० तारखेला विशेष अधिवेशन आहे. याआधी काल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र यावर काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केली असून इतका कमी दिवसात अहवाल कसा तयार होऊ शकतो ही संख्या त्यांनी उपस्थित केली आहे. तर २० तारखेला मराठा समाजासाठी एक दिवसाचा अधिवेशन ठेवलं आहे.

या अधिवेशनात विरोधकांनी येऊन आपले मुद्दे मांडावेत. आम्ही त्यांना उत्तर देऊ. तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करतोय तर ते स्वीकारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. चांगलं काम करत आहे तर ते स्वीकारा. चुकीचे काम करत असेल तर स्वीकारू नका. अनेक वर्षांपासून असलेली आरक्षणाची समस्या सुटत असेल आणि ते ही दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला बाधा न येता तर मग विरोधकांना पोटसूळ उठायचं कारण काय. मराठ्यांना टिकणारा आरक्षण मिळावं हा मुख्यमंत्र्यांचा हेतू होता आणि हे साध्य होत असलेलं बघून विरोधक आता टीका करत आहेत, असे ही गोगावले म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed