अधिवेशनाच्या पहिल्या सत्रानंतर उद्योग मंत्री उदयसामंत यांनी पत्रकारांशी बोलताना या ठरावा संदर्भात माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पहिल्या सत्रात हिंदुत्व आणि शिवसेना यांचं नातं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर एकूण सहा ठराव पहिल्या सत्रात मांडण्यात आले आहेत.
ज्यामध्ये श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन ठराव पारित करण्यात आला आहे. दुसरा ठराव हा देशाची प्रगती होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सोबत काम करणारे मंत्री यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला. तिसरा ठराव अमित शहा यांच्या संदर्भात करण्यात आला असून काश्मीर बाबत ३७० कलम या संदर्भात घेतलेला निर्णय, केंद्रशासित करण्याचा घेतलेला निर्णय तसेच महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी घेतलेले निर्णय यासाठी त्यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आलेला आहे.
चौथा महत्त्वाचा ठराव हा गेल्या वर्षभरात एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आलेला आहे. तसेच पाचवा ठराव राजकीय ठराव असून लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष ही आमची महायुती आहे. या महायुतीला ४८ जागा खासदारकीला जिंकण्यासाठी मिशन ४८ सक्सेस करण्याचा ठराव पारित करण्यात आला. तर सहावा ठराव हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचे सुरुवात केली. त्या वेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदेंसारखे अनेक सहकाऱ्यांना पुढच्या वर्षीपासून शिवसेना पुरस्कार देण्याचा ठराव पारित करण्यात आले आहेत.
पुरस्काराची वर्गवारी:
१) यामध्ये शिवसेना नेता दत्ताजी सळवी या नावाने ‘उत्कृष्ट कामगार’ पुरस्कार दिला जाईल
२) शिवसेना नेता सुधीर जोशी यांच्या नावाने नाविन्यपूर्ण ‘उभरता उद्योजक’ पुरस्कार दिला जाईल
३) प्रमोद नवलकर यांच्या नावाने ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार दिला जाईल
३) शिवसेना नेता दत्ता नलवडे यांच्या नावाने ‘आदर्श शिवसैनिक’ पुरस्कार दिला जाईल
४) दादा कोंडके यांच्या नावाने ‘कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार’ दिला जाईल
५) शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार शिवसेना नेते वामनराव महाडिक यांच्या नावाने दिला जाईल
६) उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते शरद भाऊ आचार्य यांच्या नावाने दिला जाईल
हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होतील आणि या पुरस्काराचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण होईल असे सहा प्रमुख ठराव आजच्या पहिल्या सत्रामध्ये पारित करण्यात आलेले आहेत