लातूर, दि. 15 (जिमाका) : जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात एमआयडीसी उभारण्यास राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असून यापूर्वी मागास म्हणून जात असलेल्या जळकोट तालुक्याला विकासाचे नवे मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
जळकोट येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी श्री. मेडेवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. श्याम डावळे यावेळी उपस्थित होते.
जळकोट येथे नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. आता बसस्थानकाची नवीन इमारत उभा राहणार असून यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 1300 चौरस फुटाच्या या बांधकामामध्ये दहा फलाट, स्वच्छतागृहे, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृह, महिलांसाठी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्षासह विविध आस्थापनांसाठी दुकान गाळ्यांचा समावेश असेल. येत्या वर्षभरात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास ना. बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच जळकोट येथे बस डेपो सुरु करण्याबाबत प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जळकोट आणि उदगीर येथे विविध समाजाचे स्वतंत्र भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकतेच उदगीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनासाठी 14.96 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून ही कामे दर्जेदार आणि विहित कालावधीत होण्यासाठी सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. उदगीर शहरासाठी भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जळकोट शहरातही अशाच प्रकारे भूमिगत गटार योजना राबविण्यासह पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. जळकोट तालुक्यात स्वतंत्र न्यायालय सुरू करण्यासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.
राज्य शासनाने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील आणखी 7 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट आणि उदगीर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु असून या कामांना गती देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार गोविंद केंद्रे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, व्यंकट पवार, श्याम डावळे, श्री. टाले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी प्रास्ताविकात जळकोट बसस्थानक नूतन इमरतीच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली. प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन करण्यात आले.