अमरावती, दि. 16 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत, अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जावून नवचैतन्याने लोकाभिमूख प्रशासन राबविण्यास सहाय्यता होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहाने व दर्जेदारपणे पार पडतील, असा आशावाद व्यक्त करुन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्तांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023-2024 चे दिप प्रज्वलन व क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक आर.एल. पोकळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, रमेश आडे, संतोष कवडे, हर्षल चौधरी, प्रबोधिनीचे संचालक अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, राजू फडके, वैशाली पाथरे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी व पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचही जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंचे पथ संचलन होऊन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बुलीदान राठी मुक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांव्दारे श्रीराम भक्तीपर नृत्य आणि हेमंत नृत्य कला मंदीराच्या कलाकारांकडून शिवस्तुती नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून टाळ्यांची दाद व वाहवाह मिळविली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमूने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी चमूचे अभिनंदन केले.
विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि. 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. यात पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले आहे. क्रीडा स्पर्धे अंतर्गत दिवसाला क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुध्दीबळ, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थ्रोबॉल, रिंग टेनिस, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, धावणे, जलद चालणे, कॅरम आदी खेळांचा समावेश आहे. स्पर्धेची नियमावली तयार करण्यात आली असून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्थापक, संपर्क अधिकारी व पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 18 फेब्रुवारीला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेतांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रास्ताविकातून दिली.
000