• Tue. Nov 26th, 2024

    हवाई दलाची अत्याधुनिक वाहतूक विमाने होणार ‘आत्मनिर्भर’, टाटाच्या प्रकल्पात वाहतूक विमानांची निर्मिती

    हवाई दलाची अत्याधुनिक वाहतूक विमाने होणार ‘आत्मनिर्भर’, टाटाच्या प्रकल्पात वाहतूक विमानांची निर्मिती

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक वाहतूक विमानांना ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एअरबस कंपनीची ४० विमानांची भारतात निर्मिती करण्यास ‘हवाई दर्जा हमी महासंचालक’ कार्यालयाने मंजुरी दिली आहे.

    हवाई दलाच्या ताफ्यातील ‘अॅव्रो’ या जुन्या झालेल्या विमानांच्या जागी एअरबस कंपनीकडून ५६ ‘सी २९५’ ही अत्याधुनिक विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यातील १६ विमाने या कंपनीच्या स्पेनमधील कारखान्यात तयार होऊन थेट उड्डाण करीत भारतात दाखल होणार आहेत. तर, ४० विमाने भारतीय कंपनीच्या सहकार्याने भारतातच तयार करण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठीचा भागीदार एअरबस कंपनीलाच निवडायचा होता. त्यानुसार कंपनीने टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेडची (टीएएसएल) निवड केली. या भागीदारींतर्गतच आता ‘सी २९५’ या विमानाचे भाग भारतात तयार होणार आहेत.

    याबाबत एअरबस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सी २९५ विमानांचे सुटे भाग व भागांची जुळवणी भारतातच करण्याला ‘एअरोनॉटिकल क्वालिटी अॅश्युरन्स’ महासंचालकांनी (डीजीएक्यूए) एअरबसच्या संरक्षण व अवकाश दर्जा व्यवस्थापन प्रणालीला प्रमाणपत्र दिले आहे. या अंतर्गत आता टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीमच्या देशभरातील विविध कारखान्यांमध्ये ‘सी २९५’ विमानांचे सुटे भाग एअरबसच्या तंत्रज्ञानावर व त्यांच्या परवान्याच्याआधारे तयार करून या विमानांची जोडणी करता येणार आहे. ‘सी २९५’ हे वाहतुकीचे विमान असले तरीही ते संरक्षण सामग्री वाहून नेण्याखेरीज अत्याधुनिक पद्धतीने विद्युत लहरींच्याआधारे गुप्त माहितीचे संकलन करणे, समुद्री टेहळणी करणे, उंचीवरून जमिनीवर देखरेख ठेवणे ही कामेदेखील करू शकते. असे एक विमान मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

    शिकाऊ विमान कोसळलं; विमानाचा चक्काचूर पायलट जखमी

    महाराष्ट्रातील प्रकल्पालादेखील संधी?

    नागपूरजवळील मिहान प्रकल्पातील विशेष आर्थिक क्षेत्रात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेडचा कारखाना आहे. याच कारखान्यात ‘रुआग’ कंपनीसाठी कच्चा माल तयार करण्याचे काम टीएएसएलकडून केले जाते. ‘रुआग’ ही कंपनी एअरबस ३२० विमानांना सुट्या भागांचा पुरवठा करते. याच सुट्या भागांसाठीचा कच्चा माल नागपूरजवळील कारखान्यात तयार होतो. त्यामुळेच आता ‘सी २९५’ विमानाचे हे सुटे भाग किंवा त्यासंबंधीचे काम राज्यात येण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed