पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षात नाराजी असू शकत नाही
शरद पवार यांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही. पक्षामध्ये मतभेद असतात. पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षात नाराजी असू शकत नाही. तसेच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग असू शकत नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं.
शरद पवार गटाने १० व्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये : नार्वेकर
“१० व्या सूचीकडे मी कॅलिडोस्कोपद्वारे पाहिलं. युती आघाडी होतात किंवा तुटतात हे राजकारण आहे. सर्वच कृत्ये किंवा आचरण हे पक्षांतर मानले जाऊ शकत नाही. शरद पवार गटाने १० व्या परिशिष्टाचा गैरवापर करू नये” अशी महत्त्वाची टिप्पणी नार्वेकर यांनी केली.
अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही
२९ जून २०२३ पर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान नव्हतं. परंतु ३० जून रोजी त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देऊन नव्या अध्यक्षाची निवड झाली. दोन्ही गटाच्या वतीने घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड झाली नसल्याचा दावा करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी दोन्ही गटाकडून समांतर पुरावे सादर करण्यात आले. परंतु अध्यक्ष कोण हे मी ठरवणार नाही, असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी फूट पडली होती. अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा वाजवी वेळेत निर्णय होत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. तर ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना सांगितलं होतं. त्यावर नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे निकाल जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती विचारात घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. अखेर आज नार्वेकरांनी राष्ट्रवादीतील फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला.