• Sat. Sep 21st, 2024

एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Feb 14, 2024
एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14 : राज्यात झपाट्याने नागरीकरण होत असताना त्यात विस्कळीतपणा न येता नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकासकामे होणे गरजेचे आहे. यादृष्टीने शासनाने तयार केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नगर रचना दिनाचे औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी/ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नगर रचना विभाग नवीन शहरांना आकार देण्याचे काम करीत आहे. शहरांच्या विकासात विकासकांचे देखील मोठे योगदान आहे. विकासकांनी शहरांमध्ये गृहप्रकल्प उभारताना सर्वसामान्यांना सवलती द्याव्यात, त्यांना परवडेल अशा किमतीत घरे उपलब्ध करून द्यावीत, यासाठी शासनामार्फत विविध सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अधिमूल्य तसेच स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देण्यात येत आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना कमी किमतीत घरे मिळण्यासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्यात विविध विकास प्रकल्प राबवित असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, पायाभूत सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. अटल सेतू सारखे प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार असून यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक बचत होणार आहे. उद्योगात राज्य अग्रेसर असून दावोस येथे तीन लाख 73 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. परकीय थेट गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू झाले असून शहरे सुंदर होण्यासाठी शहरांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते नियोजन विचार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या सहायक नगर रचनाकार तसेच सहायक संचालक नगर रचना यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सांघिक पुरस्कार संवर्गात मंत्रालय (खुद्द) – नवि-०७ (मेट्रो सेल) कार्यासनातील उप सचिव विजय चौधरी, अवर सचिव अजयसिंग पाटील, कक्ष अधिकारी शिरीष पाटील, कक्ष अधिकारी श्रीमती शिल्पा कवळे, सहायक कक्ष अधिकारी महेश भामरे, गणेश घाडगे, अभिजीत काळे आणि लिपिक बाळासाहेब पवार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मंत्रालय (खुद्द) – नवि-१३ कार्यासनातील संचालक तथा सह सचिव डॉ. प्रतिभा भदाणे, सहायक संचालक नगर रचना तथा अवर सचिव प्रणव कर्पे, सहायक नगर रचनाकार धनंजय साळुंखे, सहायक नगर रचनाकार धीरज मिलखे, सहायक नगर रचनाकार श्रीमती तेजस्विनी भांगे आणि लिपिक विठ्ठल जऱ्हाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सांघिक पुरस्कारामध्ये नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय – उपसंचालक, नगर रचना, मुख्य कार्यालय, पुणे (नागरी संशोधन घटक) कार्यालयातील उप संचालक नगर रचना किशोर गोखले, सहायक संचालक नगर रचना श्रीमती माधवी चौगुले, नगर रचनाकार श्रीमती दीप्ती उंडे, सहायक नगर रचनाकार श्रीमती शितल कांबळे, सौरभ नावरकर, रचना सहायक निलेश गाडगे, लघुलेखक (उ.श्रे.) रोहित चंद्रस, वरिष्ठ लिपिक श्रीमती अनिता नारंगकर, आणि लिपिक नितीन कंठाळे यांनाही पुरस्कार देण्यात आला.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मंत्रालय (खुद्द) नगरविकास – १ प्रकारात कक्ष अधिकारी लक्ष्मीकांत जाधव, शिरीष पाटील, सहायक कक्ष अधिकारी सय्यद सोफियान रशीद, निम्नश्रेणी लघुलेखक सुजाता बाचल, लिपिक शुभांगी गायकवाड आणि अजित गोसावी यांना पुरस्कृत करण्यात आले.

क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक संवर्गात सर्वश्री राजेंद्र पवार, सुनील देशमुख, कल्याण जाधव, संदीप जोशी, अतुल गावंडे, देवराव चावरे, विवेककुमार गौतम, राजेश महाले, श्रीमती प्रियंका खैरनार, ललित राठोड, सागर मोगरे, दिनेश पवार, श्रीमती ज्ञानज्योती तरार, श्रीमती आदिती न्हावकर, शिवम घुले, रवींद्र टाक, बाबुलाल उकरे यांना पुरस्कार देण्यात आला. तर क्षेत्रीय स्तरावरील अतांत्रिक संवर्गात रोहित चंद्रस, रंगनाथ पाटोळे, निरज चावरे, माधव राजुरे, अमोल सावरकर, श्रीमती सविता सोनवणे, चंद्रकांत राजे आणि दीपक वाजरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इ. बांधकामे करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारामहाल अशा अनेक इमारती रायगडावर उभ्या केल्या. 30 जानेवारी 1913 रोजी सुरु झालेल्या नगर रचना विभागास 110 वर्षे पूर्ण झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतील गडकिल्ल्यांची निर्मिती करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांची प्रेरणा मिळावी यासाठी अधिकारी/ कर्मचारी यांना हे पुरस्कार दिले जातात.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed