• Sat. Sep 21st, 2024

लग्नाच्या ३ महिन्यातच संसार तुटला, एक गोष्ट लपवली अन् प्रकरण कोर्टात, अशी चूक तुम्ही करु नका

लग्नाच्या ३ महिन्यातच संसार तुटला, एक गोष्ट लपवली अन् प्रकरण कोर्टात, अशी चूक तुम्ही करु नका

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विवाहापूर्वीच जडलेल्या आजाराची माहिती न देता तो लपवून ठेवत एखाद्याशी लग्न करणे चूक असून ते घटस्फोटाचे कारण ठरू, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी आणि एम.डब्ल्यू चांदवानी यांनी हे मत नोंदवित पतीच्या बाजूने निकाल देत पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे.

हे जोडपे अकोल्यातील आहे. त्यांचे २०१७मध्ये लग्न झाले. मुलगी लग्नाआधीच पोटोसिस नावाच्या डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होती. तिला याची माहिती असून तिने हे सांगितले नव्हते. लग्नानंतर ही बाब तरुणाच्या लक्षात आली. त्यामुळे लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पती-पत्नी वेगळे राहू लागले. मात्र, पत्नीला पतीसोबत राहायचे होते. त्यामुळे तिने अकोला कौटुंबिक न्यायालयात दाम्पत्य हक्क बहाल करण्यासाठी याचिका दाखल केली होती. तर दुसरीकडे पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अकोल्याच्या कौटुंबिक न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकाचवेळी निकाल देताना पत्नीची याचिका फेटाळून पतीची याचिका मान्य केली. या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणावरील सुनावणीत न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेत अकोला कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली.

झोपेतही डोळा उघडा

पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नी पोटोसिस नावाच्या डोळ्याच्या आजाराने त्रस्त होती. गाढ झोपेतही तिचा डावा डोळा नेहमी उघडा असायचा. तिचा व तिच्या कुटुंबाला विवाहापूर्वीच या आजाराची माहिती होती. किंबहुना तिची शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. मात्र, विवाह करीत असताना त्यांनी ही माहिती वरपक्षापासून लपवून ठेवली. तिला हा आजार लग्नानंतर झाला तर विचार करता आला असता. मात्र, विवाहापूर्वी हा आजार होता व त्याची कल्पनाही त्यांना होती. त्यामुळे तिने व पालकांनी ही वस्तुस्थिती लपवून माझी फसवणूक केली, असा दावा पतीने याचिकेत केला होता आणि घटस्फोटाची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed