• Sat. Sep 21st, 2024

अशोक चव्हाणांमुळे भाजपचे मिशन ४५ पूर्ण होणार? किती उपयोगी आहेत माजी मुख्यमंत्री, असे आहे समीकरण

अशोक चव्हाणांमुळे भाजपचे मिशन ४५ पूर्ण होणार? किती उपयोगी आहेत माजी मुख्यमंत्री, असे आहे समीकरण

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. १५ वर्षापूर्वी ८ डिसेंबर २००८ रोजी अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अशोक चव्हाण यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा एक अनोखा विक्रमच झाला होता. ते राज्याचे असे नेते ठरले ज्यांचे वडील देखील मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण यांनी काल सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात पुढील निर्णय घेऊ असे म्हटले होते आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी २१ फेब्रुवारी १९७५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. शंकरराव चव्हाण २ वर्ष ८५ दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ११ वर्षांनी १२ मार्ज १९८६ रोजी शंकरराव चव्हाण पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी २ वर्षी १०६ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले. पण दोन्हीवेळा त्यांनी पूर्ण कार्यकाळ मिळाला नाही. असेच काहीसे अशोक चव्हाण यांच्यासोबत झाले. त्यांना १ वर्ष ३३८ दिवस इतकाच कार्यकाळ मिळाला. आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने अशोक चव्हाणांना पद सोडावे लागले.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचे किती नुकसान होऊ शकते? भाजपचा किती फायदा होईल. त्यांच्यासोबत अजून किती जण भाजपमध्ये प्रवेश करतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील.

भाजपची ताकद वाढणार

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची मराठा समाजातील ताकद वाढण्याची शक्यता आहे. पण त्याच सोबत मराठवाडा क्षेत्रात भाजप ओबीसी मतांचे काय करणार हे एक मोठे आव्हान असेल. मराठवाड्यात अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. असे असले तरी चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कधीच भाजपला विजय मिळवता आला नाही. या मतदारसंघावर नेहमी काँग्रेसने बाजी मारली आहे. एकदा राष्ट्रवादी काँग्रेस तर एकदा अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता या देखील भोकरमधून विजयी झाल्या आहेत.

काँग्रेससमोर आव्हान

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फुट पडल्यानंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला होता. पण मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेस अडचणीत आली आहे. ऐन राज्यसभा निवडणुकीच्या आधी पक्षाला निवडणुकीची रणनिती करण्याऐवजी पक्ष वाचवणे आणि नेत्यांना एकत्र ठेवणे यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत अन्य काही नेते आणि आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. असे झाले तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणखी कमकूवत होईल. दुसऱ्या बाजूला राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस कमकूवत झाल्याचा फायदा भाजपला त्यांचे मिशन ४५ चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. २०१९ मध्ये भाजपने शिवसेनेसोबत ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. भाजपने ३७० चे लक्ष्य ठेवल्याने राज्यातील लोकसभेच्या जागा वाढवाव्या लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed