ग्रेस काकडे यांनी (निलोफर नदाफ) पुणे जिल्ह्यातल्या दौंडमधून सोलापुरातील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षणासाठी १९९१ साली प्रवेश घेतला होता. ट्रेनिंग सेंटरमधील शिक्षक डॉ. नबीलाल नदाफ यांच्याशी त्यांची पाहिली भेट १९९१ साली झाली होती. पहिल्या नजरेत दोघांनीही एकमेकांना प्रेमाची मूक संमती दिली होती. १९९१ ते १९९३ पर्यंत त्यांच्यात फक्त तीनच भेटी झाल्या होत्या. १९९३ साली ऑपथलमिक ऑफिसर असलेले डॉ नबीलाल नदाफ यांनी लग्नाची इच्छा बोलून दाखवली आणि ग्रेस यांनीही लगोलग होकार दिला. सुरुवातीला प्रेमाची कुणकुण कुणालाही लागू दिली नाही. वर्षभर दोघांत लग्नाबाबत चर्चा होत होत्या. ग्रेस ख्रिश्चन आणि डॉ. नबीलाल मुस्लिम असल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. डॉ नबीलाल यांनी स्वतःच्या घरात प्रेमप्रकरणाबाबत सांगितले. ख्रिश्चन मुलगी नको म्हणून घरच्यांनी जबरदस्त विरोध केला. डॉ. नबीलाल नदाफ यांच्या कुटुंबीयांनी दुसरीकडे स्थळ जमवून १५ मे १९९४ रोजी लग्न ठरविले. जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती, वेगवेगळे प्लॅनिंग करत ग्रेस आणि डॉ नबीलाल एकमेकांची समजूत घालत होते. अखेर डॉ. नबीलाल नदाफ यांनी दुचाकी घेऊन ९ मे १९९४ रोजी एकटेच घरातून निघून गेले आणि लग्नाची तारीख ओलांडल्या नंतरच घरी परतले.
ग्रेस आणि डॉ नबीलाल यांनी २ जुलै १९९४ रोजी तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात जाऊन लग्न केले. मुस्लिम धर्माचा असूनही ख्रिश्चन मुलीसोबत लग्न केलं म्हणून सुरुवातीला डॉ नबीलाल यांना घरच्यांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्त विरोध केला. दोन महिने त्यांना कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले.
ग्रेस या नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थिनी होत्या. तर डॉ नबीलाल त्याच महाविद्यालयात ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षक होते. शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत पळून जाऊन लग्न केल्याने राज्यभर चर्चा देखील झाली होती. मात्र आम्ही दोघे आमच्या निर्णयावर ठाम होतो असे ग्रेस यांनी सांगितले.
ते मुस्लिम-मी ख्रिश्चन- तुळजापूरच्या मंदिरात जाऊन लग्न केलं
डॉ नबीलाल यांनी कधीही मला धर्माची बंधने घातली नाहीत. मी स्वतःहून मुस्लीम धर्म स्वीकारला आणि ग्रेस काकडेची निलोफर नदाफ झाले. आम्हा दोघांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शासकीय नोकरी देखील लागली. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत गेली. मंदिरात जाऊन लग्न केल्यानंतर दौंड येथे जाऊन वडिलांची भेट घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केल्याचं निलोफर यांनी सांगितलं.
तीस वर्षांपूर्वी लग्न झाले. आज आम्ही दोघे एकमेकांच्या धर्माचा आदर करत सुखी संसार केला. दोन अपत्य झाली. मोठ्या मुलीने आर्किटेक्चरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि मुलगा एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत.
माझ्या घरात आज बायबल आणि कुराण असे दोन्ही धर्मग्रंथ
निलोफर नदाफ या मुस्लिम धर्मातील सर्व सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. ख्रिसमसला चर्चला जाऊन मनाचे समाधान होते, असेही त्या सांगतात. माझ्या घरात आज बायबल आणि कुराण असे दोन्ही धर्मग्रंथ आहेत. माझे पती डॉ नबीलाल यांनी मला कधीच धर्माची बंधने घातली नाहीत. माझ्या राहण्या-खाण्यावर त्यांनी कधीच मर्यादा घातल्या नाहीत, एका जोडीदाराकडून आणखी अपेक्षा काय असतात? असं त्या आवर्जून विचारतात.