• Thu. Nov 28th, 2024

    अशोक चव्हाणांनी साथ सोडली, पक्षांतर्गत निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, डॅमेज कंट्रोल होणार का?

    अशोक चव्हाणांनी साथ सोडली, पक्षांतर्गत निवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय, डॅमेज कंट्रोल होणार का?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : प्रदेश काँग्रेसमध्ये झालेल्या भूकंपाचे झटके भले सोमवारी बसले असले तरी, तब्बल चार वर्षांपासूनच याबाबतचे संकेत मिळू लागले होते. आता राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी तीन दिवस उरले असताना आणि लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आली असताना ‘कॉँग्रेस एक्झिट’ला मुहूर्त लाभला आहे.

    राज्यात महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश न झालेले तसेच दुय्यम खाते मिळालेले असे अनेक असंतुष्ट लगेच सक्रिय झाले. अर्थात त्यावेळी भाजपचा आघाडीतील तिन्ही पक्षांच्या असंतुष्टांवर डोळा असला तरी सर्वात मोठा पर्याय काँग्रेसचा होता.

    आघाडीचा पहिला अर्थसंकल्प २०२० साली सादर होत असताना राज्यात फेरबदलाचे वारे वाहू लागले. दुसरीकडे मध्य प्रदेशमध्येही असाच असंतोष खदखदत होता. राज्यांच्या राजकीय स्थितीनुसार फॉर्म्युले ठरत होते. भाजपकडे असलेल्या संख्याबळात काँग्रेसचे एक ते दीड डझन असंतुष्ट येण्याचे संकेत मिळू लागले. दरम्यान, करोनाचे संकट विश्वव्यापी झाले आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येताच, लॉकडाऊन लागले. यात महाराष्ट्र मागे पडला. लवकरच या संकटातून बाहेर पडू, अशी शक्यता व्यक्त होऊ लागल्याने एप्रिल आणि मे असे दोन मुहूर्त निघाले. भर लॉकडाऊनमध्ये विशेष परवानगीने काही आमदारांचे दौरे झाले. पक्षातील बड्यांसोबत दोन बैठका झाल्या. मात्र, काँग्रेसला मुहूर्त मिळाला नाही.

    यादरम्यान, शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फुटल्याने काँग्रेस असंतुष्टांचा भाव घसरला. आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर राष्ट्रीय पातळीवर मिशन ४००साठी महाराष्ट्रातील या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

    जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!
    निवडणूक प्रक्रियेला ब्रेक

    काँग्रेस कार्यसमिती, निवडणूक समितीसह पक्षाच्या महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये अग्रणी असणारे अशोक चव्हाण यांच्याकडे मित्र पक्षांशी वाटाघाटीचीही जबाबदारी होती. त्यांनी दिलेल्या धक्क्यामुळे पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागले. चव्हाण व विश्वासूंकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या आता अन्य पदाधिकाऱ्यांकडे सोपवाव्या लागणार असल्याने नव्याने फेरबांधणीची चर्चा सुरू झाली आहे.

    संशयाचा भोवरा, डॅमेज कंट्रोलची गरज

    काँग्रेसमध्ये सोमवारी आलेल्या वादळामुळे पक्षाला या धक्क्यातून सावरत कुंपणावर कोण याचा अंदाज घेऊन तातडीने डॅमेज कंट्रोल करावे लागेल, असा सूर व्यक्त होऊ लागला. अशोक चव्हाण यांचे मराठवाड्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात विश्वासू व समर्थक आहेत. यातील बरेच जण संशयात आले आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण जाणार, किती समर्थक त्यांना साथ देतील, यावर पक्षाची आगामी व्युहरचना अवलंबून राहील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed