• Fri. Mar 13th, 2026

    न्यायमंदिरातील प्रतीक्षा संपेना; जिल्ह्यातील अडीच लाख दावे-खटले प्रलंबित, गत महिन्यात ४ हजार निकाली

    न्यायमंदिरातील प्रतीक्षा संपेना; जिल्ह्यातील अडीच लाख दावे-खटले प्रलंबित, गत महिन्यात ४ हजार निकाली

    सौरभ बेंडाळे, नाशिक : जलदरित्या न्यायालयीन दावे आणि खटले निकाली काढण्यासाठी विविध स्वरुपाच्या प्रयत्नांसह ‘ई-कोर्ट’च्या माध्यमातून कार्यवाही होत असताना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दावे व खटल्यांची यादी वाढत आहे. त्यामुळे सध्या सुमारे अडीच लाख दावे आणि खटले प्रलंबित असून, गत महिन्यांत चार हजार दावे-खटले ‘निकाली’ काढण्यात आल्याची नोंद ‘राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड’ने केली आहे. प्रलंबित खटल्यांमागील कारणे शोधून त्यावरही न्यायालयीनस्तरावर कार्यवाही होत असल्याने हा न्यायमंदिरातील ‘वेटिंग’ घटण्याची शक्यता आहे.

    नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात विविध स्वरुपाचे २ लाख ५४ हजार २९४ दावे व खटले प्रलंबित आहेत. तर, जानेवारी २०२४ अखेर नाशिक जिल्ह्यातील १ हजार ३२२ दिवाणी आणि २ हजार ८३७ फौजदारी खटल्यांची अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांपैकी ४ हजार १५९ दावे व खटल्यांचे निकाल न्यायालयाने दिले आहेत. परिणामी, जलद कार्यवाहीसाठी ‘ई-कोर्ट’चा पर्यायही वापरण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय हे राज्यातील ‘ई-कोर्ट’चा ‘पायलट प्रोजेक्ट’ आहे. त्यामुळे प्रलंबित दावे आणि खटल्यांची संख्या जरी अधिक असली, तरी पक्षकार, वकील, तपास यासंदर्भातील ‘अपडेट’मधून दावे-खटले निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    प्रलंबित दावे, खटले (जिल्हा न्यायालय)

    – दिवाणी – ८० हजार २०६

    – फौजदारी – १ लाख ७४ हजार ८८
    – महिलांचे दावे, खटले – १९ हजार ३२७
    – ज्येष्ठांचे दावे, खटले – १८ हजार ८७५
    – त्यापैकी २४ हजार ६३५ दिवाणी दावे
    – १३ हजार ५६७ फौजदारी खटले
    – १ ते ३ वर्षांआतील – ६९ हजार ५०१
    शिक्षकांचे बहिष्कारास्त्र; बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास नकार, काय कारण?
    ‘राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड’च्या नोंदीनुसार

    – देशात सुमारे ४ कोटी ४८ लाख ५१ हजार ५६२ दावे, खटले प्रलंबित
    – महाराष्ट्रात ५२ लाख ४३ हजार २६२ दावे, खटले प्रलंबित
    – महाराष्ट्रात महिला व ज्येष्ठांचे ८ लाख ५ हजार ९२३ दावे, खटले
    – राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये ४.७४ टक्के महिला व ज्येष्ठांचे दावे, खटले

    कालावधी निहाय प्रलंबित
    कालावधी – दिवाणी दावे – फौजदारी खटले

    १ वर्षांआतील – १८,८११ – ३५,९२१
    १ ते ३ वर्षांआतील – २१,११९ – ४८,३८३
    ३ ते ५ वर्षांआतील – १३,००४ – ३९,६९२
    ५ ते १० वर्षांआतील – १९,४९९ – ३७,३६२
    १० ते २० वर्षांआतील – ६,९८५ – १०,०५०
    २० ते ३० वर्षांआतील – ६९५ – १,७३९
    ३० वर्षांवरील – ९३ – ९४२

    प्रलंबित खटल्यांची कारणे…

    प्रलंबित खटल्यांमागे अनेक कारणे आहेत. पक्षकारांचे वकील हजर नसल्याने ७२ हजार ७६ दावे आणि खटले प्रलंबित आहेत. यासह गुन्ह्यातील संशयित न्यायालयात हजर न होणे अथवा फरार असणे या कारणांमुळे ५८ हजार २९ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच न्यायालयात पुरेसे कागदपत्र सादर न केल्याने २७ हजार २८३ दावे व खटले प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, ७ हजार ६७८ खटल्यांमध्ये पक्षकारांना स्वारस्य नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यासह ६ हजार ४२३ खटल्यांमध्ये महत्त्वाचे साक्षीदार उपस्थित राहण्यास अडचणी येत आहेत. तसेच न्यायालयीन स्थगिती, अपूर्ण कागदपत्रे, समन्स व नोटिसांची पूर्तता रखडणे यासह इतर कारणांतून हे खटले व दावे प्रलंबित असल्याचे समोर येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed