• Sat. Sep 21st, 2024
नऊ महिने वेतन थकलं; कर्जाचे हफ्ते फेडण्यास असमर्थ, कंटाळून व्यक्तीनं संपवलं जीवन

रायगड: जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून नेरळ सम्राटनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नऊ महिने ग्रामपंचायतीकडून पगार मिळाला नसल्यामुळे बँकेचे हप्ते थकले होते. त्यातच घरात दुसरा कोणी कमवता नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
आधी साधं विचारत नव्हते, आता फोन करतायेत, अजितदादांचा पुन्हा शरद पवारांवर बोचरा वार
मिळालेल्या माहितीनुसार, नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सम्राटनगर येथे राहणारा आणि नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव यांनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला लटकत आपले जीवन संपविले आहे. गणेशला आवाज दिला असता तो घराचा दरवाजा उघडत नसल्याने स्थानिकांनी खिडकीतून वाकून पाहिले. त्यांना गणेश हा घरात पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

यावेळी येथील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गणेश हा गेली दहा वर्षाहून अधिक काळ नेरळ ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. मात्र गेली नऊ महिने नेरळ ग्रामपंचायतीकडून सफाई कर्मचाऱ्यांना पगार दिले गेलेले नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे बँकेकडून घेतलेले लोनचे हप्ते भरण्यासाठी त्याला नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. पगाराशिवाय इतर कोणता आर्थिक स्त्रोत नसल्याने गणेशला दोन लहान मुलांचे शिक्षण, घरातील घरखर्च चालवणे कठीण जात होते.

अजित पवारांना निखिल वागळे दादा म्हणाले, कार्यकर्ते म्हणाले आता रोहित पवारच दादा !

शुल्लक कारणावरून तसेच आर्थिक विवंचनेतून पत्नीसोबत चिडचिड होत होती. त्यातूनच गणेश जाधवने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. नेरळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असे ४० हून अधिक सफाई कर्मचारी आहेत. ज्यांना नऊ महिने पगार मिळालेला नसल्याचे कर्मचारी वर्गाकडून बोलले जात आहे. त्यांच्याही घरी गणेशच्या घरच्या सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशच्या आत्महत्येमागे कोणाला दोषी ठरवायचे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed