• Sat. Sep 21st, 2024
…मग तुम्ही मत मागायला कशाला येता? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल

मुंबई: महाराष्ट्रात सध्या गुंडगर्दी सुरू आहे. महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला आहे. राज्यात कोणते उद्योगधंदे येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. हे या नाकर्त्या राज्यकर्त्यांना कळत नाही आहे. महाराष्ट्राची अशी बदनामी करायची की महाराष्ट्रात कोणी येऊच नये अशी परिस्थिती निर्माण करायची. मुंबईत राहणाऱ्यांची इतकी वाट लावायची की मुंबई पूर्ण भिकेला लावायची. हे बघून जीव जळतोय म्हणून लढाईला उभा आहे, असं वक्तव्य राज्यात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे आज धारावीत आले होते. यावेळी त्यांनी धारावीकरांजवळ संवाद साधला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंनी सरकारसह गृहमंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. ते म्हणाले की, काल परवा आमचा चांगला कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर मारला गेला. यावर आज मी बोललो. गेल्या आठवड्यात भाजपच्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. आमच्या एका कार्यकर्त्यावर गोळीबार त्याची हत्या झाली. आज जळगावमध्येही भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. सर्वच ठिकाणी हत्या होत आहेत. मात्र गृहमंत्री आहेत की नाही? असा सवाल थेट उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांना केला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, या घटनांनंतर गृहमंत्र्यांकडे राजीनामा मागितल्यावर गृहमंत्री म्हणतात, उद्या गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागाल. मग तुम्ही यांच्याकडे मत मागायला कशाला येता. आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला. मात्र तुमच्या लेखी ही सर्व जनता कुत्र्यामांजरासाठी असेल तर निवडणुकीसाठी मत मागायला आल्यावर तुम्हालाही त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल. तुमची शक्ती काय आहे ही जर तुम्ही दाखवून देऊ शकला नाही तर आवो जाओ घर तुम्हाला तसेच आम्हाला मिठागरात टाका नाहीतर अजून कुठेही टाका, आम्हाला काही फरक पडत नाही, असं होईल. म्हणूनच मी तुम्ही जागे आहात की नाही हे पाहायला आलो होतो.

ते म्हणाले की, मला काही साटलोट करायचं असतं तर मी करून मोकळा झालो असतो. तुम्हाला कळलेही नसतं. मात्र मी गरिबांसोबत उभा राहिलो आहे. ही माझी ताकद आहे. तुमच्यासाठी मी लढाईला उभा राहिलो आहे. करार करणं सोप आहे. मात्र तुमचं आयुष्य खराब करुन मी कोणता करार करणार नाही, असं वक्तव्य ठाकरेंनी केले आहे.

निर्दयी मनाचा गृहमंत्री, संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही; ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

आगामी निवडणुकीवर ठाकरे म्हणाले की, आता निवडणुक तोंडावर आली आहे. दिल्लीत तुमच्यासाठी आवाज उठवणारा खासदार तुम्हाला हवा आहे की, आपण इथून जसा पाठवलेला गद्दार खासदार तुम्हाला हवा आहे, असा सवाल ठाकरेंनी धारावीकरांना विचारला. ते पुढे म्हणाले की, दिल्लीत जाऊन खुर्चीचे तळवे चाटणारा खासदार तुम्हाला हवा आहे का हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुम्ही घेतला आहे. आम्ही मैदानात उतरलो आहोत. या लढाईत मी पुढे आलोच आहे. मात्र तुम्ही साथ देणार आहात की नाही? उद्या तुमच्यावर पैशाचा वापर होईल. विकले जाणार आहात का ? तुम्ही जागा विकणार नाही तर तुमच्या पिढ्यांचे आयुष्य विकणार आहात. हे आयुष्यही आता गुंडगिरी करणाऱ्या सरकारकडे आणि त्यांच्या दलालाकडे विकणार आहात. यामुळे कोणत्याही दहशतीला बळी पडू नका. अदानींच्या दलाला घाबरु नका, असं आवाहन करत ठाकरे म्हणाले, आता मी घोषणा करतो धारावीकरांनो ठाम उभं राहा. पूर्ण शिवसेना तुमच्यासोबत आहे, असं वचन उद्धव ठाकरेंनी यावेळी धारावीकरांना दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed