• Sat. Sep 21st, 2024

मुली – मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

ByMH LIVE NEWS

Feb 10, 2024
मुली – मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळांची निर्मिती करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. १० (जिमाका) राज्यातील सर्व आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्र, जीवशास्र आणि गणित विषयांच्या स्वतंत्र लॅब निर्माण केल्या जाणार असून येणाऱ्या काळात प्रत्येक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात मुले व मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने लोभाणी (ता.तळोदा) येथील मुलींच्या आश्रम शाळेच्या इमारत उद्घाटन प्रसंगी मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, जि.प.सदस्य श्री. वळवी, सरपंच जयश्री पावरा, वसंत वळवी, नवलसिंग वळवी, शिवाजी पराडके, मुकेश वळवी, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.राऊत, श्री. कोकणी शिक्षक, विद्यार्थी, पालक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा सर्व सुविधांनी युक्त स्वमालकीच्यी शासकीय इमारतीत आणल्या जात आहेत. त्यात तळोदा प्रकल्पातील ९८ टक्के इमारतींचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत २ टक्के इमारती येत्या जून महिन्याच्या आत पूर्णत्वास येतील. तसेच या आश्रमशाळांना जोडून मुला, मुलींची स्वतंत्र वसतिगृहेही निर्माण केली जात आहेत. येत्या काळात दुर्गम भागातील आश्रमशाळांना जोडून शिक्षक, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र निवास्थाने तयार करण्याचा शासनाचा मानस असून त्यामुळे शिक्षकांचे २४ तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करियर करावेसे वाटते त्या क्षेत्रात त्यांनी करिअर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर तीन महिन्यांनी मुलांची परीक्षा घेऊन त्यांच्या आकलन व व गुणवत्तेनुसार तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना प्रत्यक्ष अथवा व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांसोबत आता शिक्षकांचीही परिक्षा घेतली जाणार आहे. ज्या शिक्षकांना परीक्षेअंती प्रशिक्षणाची गरज आहे, त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. परीक्षा आणि प्रशिक्षणानंतरही ज्या शिक्षकांचे विद्यार्थी नापास होतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येईल. येत्या काळात ८ वी पासून पुढे विद्यार्थ्यांचा कल तपासून ज्या मुलांचा स्पर्धा परीक्षेस योग्य कल व गुणवत्ता असल्याचे लक्षात येईल त्यांना उच्च शिक्षणापर्यंत स्पर्धा-परीक्षायोग्य शिक्षण व प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्याच प्रयत्नात ही मुले स्पर्धा परीक्षेत पास होतील एवढ्या गुणवत्तेचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed