मालेगाव: लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनी देखील सुरू केली आहे. काही दिवासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुकीसाठी १०० दिवस शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार यादी फायनल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. राजकीय पक्षांसह नागरिकांना देखील निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतील याची उत्सुकता लागली आहे. अशाच राज्यातील भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे.
वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी मालेगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी यंत्रमाग धारकांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटलांनी लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी लागू होणार याची तारीखच सांगून टाकली.
पाटील म्हणाले, पाच मार्चच्या दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मी जर अचूक तारीख सांगितली तर हे पत्रकार म्हणतील यांना कशी काय आधीच तारीख कळाली. साधारण ५ मार्चच्या दरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. एकदा का आचारसंहिचा लागू झाली की त्यानंतर मतदारांवर प्रभाव पडले असा कोणताही निर्णय घेता येत नाही.