• Sat. Sep 21st, 2024

मनोज जरांगे आज नाशिकमध्ये; साल्हेर किल्ल्यावरील शौर्यदिन कार्यक्रमाला राहणार उपस्थित, असा आहे दौरा

मनोज जरांगे आज नाशिकमध्ये; साल्हेर किल्ल्यावरील शौर्यदिन कार्यक्रमाला राहणार उपस्थित, असा आहे दौरा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील गुरुवारी (दि. ८) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सात वाजताच त्यांचे नाशिक शहरात आगमन होईल. शहरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर दिंडोरी, कळवण, मालेगाव, नांदगावमार्गे ते छत्रपती संभाजीनगरला रवाना होणार आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाने दिली.

सगे सोयऱ्यांसह सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता राज्यभरातील हजारो मराठा समाजबांधव जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या वेशीवर पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या काही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी १० फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून नाशिकमधील मराठा बांधवही या आंदोलनात सहभागी झाले होते. सुरुवातीपासून नाशिक लढ्याच्या केंद्रस्थानी होते. जरांगे यांनी सरकारकडून मागण्या मान्यतेबाबतचा अध्यादेश स्वीकारल्यानंतर नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मनोज जरांगे पाटील हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर नाशिक जिल्हा हा एकसंघपणे साथ देत राहील, असा निर्णय येथील सकल मराठा समाजाने प्रारंभीच जाहीर केला होता.

…असा आहे दौरा

या पार्श्वभूमीवर त्यांचा राज्य दौरा सुरू असून, गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता ते मुंबईहून नाशिककडे मार्गस्थ होतील. सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई नाका येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकमधील उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी दिली. दिंडोरी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथून ते वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते कळवण, देवळा येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. कंदाना फाटा येथे अहिल्याबाई देवी होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सटाणा येथे यशवंतराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन ओंदाने, विरगाव, ताहराबाद, अंतापूर मार्गे सकाळी ११ वाजता ते साल्हेर किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साल्हेर किल्ल्यावर शौर्यदिन साजरा करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, मनमाड, मालेगाव चौफुलीमार्गे ते नांदगाव शहरात पोहोचतील. दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी जरांगे हे केवळ सत्कार स्वीकारणार असून, कुठेही ते मनोगत व्यक्त करणार नसल्याची माहिती सकल मराठा समाजाचे करण गायकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed