• Sat. Sep 21st, 2024

प्रशासनाने गुंडाळली ‘सेवा हमी’; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

प्रशासनाने गुंडाळली ‘सेवा हमी’; कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

नागपूर : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा हमी कायदाही अस्तित्वात आहे. मात्र, अद्यापही अनेकांना लेटलतीफ प्रवृत्तीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘प्रशासकीय विभाग आमचे कामच करीत नाहीत, पायपीट करून आम्ही थकलो’, अशी व्यथा मांडत शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालयाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. वर्षभरात प्राप्त यातील ६८६ प्रकरणांपैकी ४७१ प्रकरणे निकाली काढल्याचा दावा, मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला.

सरकार दरबारी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रश्न सुटण्याची गती मात्र संथच असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. ‘लोकशाही दिन’, ‘सेवा हमी कायदा’ या माध्यमातून सामान्य जनतेच्या समस्या वेळेत सोडवण्याचे प्रयत्न शासनदरबारी केले जात आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश (२०१५) नुसार नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी सेवा हमी कायदा अस्तित्वात आला. जातीचे प्रमाणपत्र २१ दिवसांत, उत्पन्नाचा दाखला १५ दिवसांत, नॉन क्रिमिलेअर २१ दिवसांत, वय व अधिवास १५ दिवसांत मिळण्याची हमी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाच्या माध्यमातून नागरिकांना मिळाली. सेवा देणे हे संबंधीत प्रशासकीय विभागांचे काम असतानाही चालढकल केली जात असल्याचे पुढे येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त अर्जांपैकी तांत्रिक अडचणींमुळे २१५ प्रकरणे विविध विभागांकडे प्रलंबित आहेत. चौकशीत अडकले असल्याने ते निकाली काढण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्ज कोणत्या विभागाशी संबंधित आहे, याची शहानिशा केली जाते. त्या विभागांना हा अर्ज पाठवून सात दिवसांच्या आत तो निकाली काढण्याची मुदत दिली जाते. अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातात. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा केला जातो, असे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांचे सहायक राहुल गोल्हर यांनी सांगितले.

कर्मचारी देतात उडवाउडवीची उत्तरे

जानेवारी २०२३पासून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले. नागरिकांचे प्रश्न संबंधीत प्रशासकीय कार्यालयातच सुटणे अपेक्षित आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडील तक्रारींचा ढीग वाढत चालला आहे. महापालिका, पोलिस विभाग, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, शिक्षण या विभागांच्या तक्रारींची संख्या अधिक आहे. अर्धवट रस्ते, भूखंड मंजूर करण्याची प्रकरणे, डिमांड नोट मिळत नाही, पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही, नवीन विजेचे मिटर मिळण्यात अडचणी जातात, भूमिअभिलेख विभागाकडून सहकार्य मिळत नाही. नामांतरणाच्या प्रकरणात चार महिन्यांपेक्षा अधिक काळ पायपीट करावी लागते, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
रुग्णांनी सेवन केले बोगस अ‍ॅन्टिबायोटिक; पावणेचार लाख टॅबलेट फस्त, उत्पादक कंपनी अस्तित्वातच नाही
मुख्यमंत्र्यांच्या दारात सुटलेले प्रश्न
विभाग : नागरिकांच्या तक्रारी
महापालिका : ६९
पोलिस विभाग : ६२
जिल्हापरिषद : ४२
नासुप्र : ३९
ग्रामीण पोलिस : २३
भूमिअभिलेख : १६
नगर भूमापन : ५
पीडब्ल्यूडी : १६
उत्पादन शुल्क : ५
उपसंचालक शिक्षण : ७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed