• Sat. Sep 21st, 2024
माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे गेले अनेक दिवस नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला राम राम करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बाळासाहेब जेव्हा गेले तेव्हा सगळं संपलं आमचं, असं म्हणायची वेळ आज आली आहे, असं म्हणत कोकणातील ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्ता फार काळ शांत बसू शकत नाही, असं सांगत २०१४ साली झालेल्या विधानसभेतील पराभवाचे शल्यही त्यांनी बोलून दाखवलं. २०१४ साली मला पाडण्याचा ऑपरेशन हे स्वकियांनीच केलं, असाही टोला दळवी यांनी लगावला आहे. या दहा वर्षाचा काळ हा कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा गेला. भाजपसारखा मोठा राष्ट्रीय पक्ष दिल्ली पासून गल्लीपर्यंत काम करणारा पक्ष हा वेगाने काम करतो आहे. ही काम कोकणात दापोली विधानसभा मतदारसंघातही व्हायला हवीत, हे आमचे स्वप्न असल्याचं दळवी यांनी सांगितलं.
…म्हणून आता राज्यसभेत मागच्या दारातून येण्याचा प्रयत्न करतील; उद्धव ठाकरेंचा सुनील तटकरेंवर निशाणा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी सांगितलं होतं की, हा माझा हिरा आहे. याला कधी हात लावू नका, परंतु बाळासाहेब गेल्यानंतर तसं कधी झालं नाही. आम्ही काम करत असताना सातत्याने सूचना करण्यासाठी वेळ मागत होतो, पण ती वेळही आम्हाला दिली गेली नाही. मग आमच्यासमोर कोणता पर्याय नव्हता, असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं आहे. त्यानंतर आम्हाला हा निर्णय घेणं गरजेचं वाटलं. शिवसेनेचा विचारही हिंदुत्वाचा होता भाजपाचा ही विचार हा विशाल आहे. त्यामुळे येथे चांगल्या प्रकारे काम करता येईल, असेही माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी सांगितलं.

माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि रामदास भाई कदम यांचे राजकीय वैमनस्य हे सर्वश्रुत आहे. मात्र आता दळवी यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर सत्तेत सहभागी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप आणि अजित दादांचे राष्ट्रवादी या महायुतीबरोबर त्यांना काम करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता दापोली येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्याबरोबरही माजी आमदार सूर्यकांत दळवी हे जुळवून घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कृपया उपोषण मागे घ्या, ईडी कार्यालयाबाहेर बसलेल्या समर्थकांना रोहित पवारांची विनवणी

सूर्यकांत दळवी यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मंडणगड येथील प्रकाश शिगवण तसेच दापोली येथील माजी पंचायत समिती सभापती शांताराम पवार, आदी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपाचे उदय जावकर, स्मिता जावकर, जिल्हाध्यक्ष केदार साठे, दापोली तालुकाध्यक्ष संजय सावंत, भाजपा प्रदेश युवा नेते अक्षय फाटक, भाजपच्या कामगार आघाडीचे स्वरूप महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed