• Mon. Nov 25th, 2024

    आचारसंहितेच्याआधी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता, शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची चर्चा

    आचारसंहितेच्याआधी पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता, शिवजयंतीला शिवनेरीवर जाणार असल्याची चर्चा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, या वेळी ते शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन, रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गास हिरवा झेंडा दाखविण्यासह पिंपरी ते निगडी या नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन केले जाण्याची शक्यता आहे.

    ‘शिवनेरी’वर शिवजयंती उत्सव

    आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या आचारसंहितेपूर्वी मोदी यांचा पुणे दौरा अपेक्षित आहे. या दौऱ्यात ते शिवजयंती उत्सवास शिवनेरी येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. मोदी यांचे पुणे शहरातही काही कार्यक्रम अपेक्षित आहेत. त्यात लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन अपेक्षित आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून पंतप्रधान मोदींना तसे निमंत्रण पाठविले असून, पुण्यातील इतर कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.

    रामवाडी मेट्रोमार्गास हिरवा झेंडा

    रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाच्या (सीएमआरएस) पथकाकडून नुकतीच पूर्ण करण्यात आली असून, त्यांनी महामेट्रोला काही सूचना केल्या आहेत. या सूचनांच्या पूर्ततेनंतर हा मार्ग प्रवासासाठी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील रुबी हॉल ते रामवाडी मार्गाची मेट्रोकडून सर्व कामे पूर्ण केली आहेत. या मार्गाची मेट्रोकडून चाचणीदेखील पूर्ण केली आहे. त्यानंतर ‘सीएमआरएस’च्या पथकाने दोन दिवस या मार्गाची; तसेच बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी मेट्रो स्थानकांची तपासणी झाली आहे.

    असे असणार नवे टर्मिनल

    – लोहगाव विमानतळाचे सध्याचे टर्मिनल २२ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे.

    – या टर्मिनल इमारतीची वार्षिक प्रवासी क्षमता ७० लाख आहे.

    – पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या नव्या टर्मिनलचे क्षेत्र ४६ हजार ४५० चौरस मीटर आहे.

    – नवे आणि जुने दोन्ही टर्मिनल एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरी वाहतुकीसाठी ६९ हजार ६०० चौरस मीटरचे टर्मिनल उपलब्ध होणार असून, विमानतळावरील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.

    – नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीत (जुन्या इमारतीसह) दहा पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज, ७२ चेक-इन काउंटर आणि इन-लाइन बॅगेज हाताळणी यंत्रणा असतील.

    – ‘खानपान सेवा’ आणि किरकोळ वस्तूंच्या विक्रीसाठी ३६ हजार चौरस फूट जागेची तरतूद करण्यात आली आहे.

    रोड-शो आणि सभाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या काही दिवसांतील दौरे पाहिले, तर ते संबंधित शहरांत रोड शो-जाहीर सभांना संबोधित करीत असल्याचे चित्र दिसले आहे. पुण्यात त्यांच्या प्रस्तावित दौऱ्यात रोड-शो किंवा जाहीर सभा होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed