• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली ​वेश्याव्यवसाय, पोलिसांना खबर लागली, अन्….

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाणेर येथे एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला अटक केली आहे.

    सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस अंमलदार मनीषा पुकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिमरन ऊर्फ वैष्णवी दीपक पवार (वय ३७, रा. पिंपळेगुरव) आणि अन्य एकावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर म्हाळुंगे रस्त्यावरील दक्षिणमुखी स्पा आणि रॉयल हमाम अँड स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती समाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून त्याची खातरजमा करून छापा टाकण्यात आला. त्यानंतर तेथून दोन मुलींची सुटका करण्यात आली. चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी याचा तपास करीत आहेत.

    चतु:शृंगी पोलिसांचा काणाडोळा

    चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत याच आठवड्यात बालेवाडी येथील दोन हॉटेलमधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणण्यात आले होते. हे सेक्स रॅकेट ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येत होते. आता बाणेर येथील स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणची कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे. यामुळे अशा घटनांकडे स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

    ‘नाइट लाइफ’च्या नावाखाली मोकळे रान

    बाणेर, बालेवाडी परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि बार सुरू राहतात. नाइट लाइफच्या नावाखाली अनेक काळ्या धंद्यांना मोकळे रान मिळत असल्याचे दिसून येते. सूस-पाषाण येथील एका ढाब्यावर काही दिवसांपूर्वी लाखो रुपयांचा गुटखा देखील अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला होता. त्यामुळे या भागातील बेकायदा गोष्टींना चाप लावण्यासाठी कारवाईत सातत्य राहणे गरजेचे आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed