मुंबई, दि. ३० : जर्मनीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. जर्मनीला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील तरुणांना कौशल्य विकासासाठी आणि रोजगार संधींसाठी जर्मनीला पाठवण्याविषयी यावेळी चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह जर्मनीच्या शिष्टमंडळाचे अँड्रियास रीफस्टेक, प्रो.डॉ.रोलँड हास हे उपस्थित होते.
युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजनांबाबत विचारविनिमय करण्यासाठी राज्यस्तरीय कृती गट स्थापन करण्यात आले आहे. या कृती गटाचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठविण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिष्टमंडळासह भेट घेतली. बैठकीत श्री. मुश्रीफ यांनी राज्यात विविध कौशल्य प्राप्त वैद्यकीय कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांना प्रशिक्षण आणि जर्मन भाषेचे प्रशिक्षण देवून निवड पात्र मनुष्यबळ जर्मनीत पाठवण्यात येईल, असे सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/