बारामती, दि. २८ : तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता शादीखाना परिसरात उर्दू शाळा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करा. तसेच यापुढे प्रशासकीय इमारतीचे प्रस्ताव सादर करतांना सौर पॅनलचा समावेश करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील तांदुळवाडी येथील रेल्वे अंडरपास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ग्रंथालय, बारामती बसस्थानक नुतनीकरण, वसंतराव पवार नाट्यगृह आणि शादीखाना येथील विविध विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.
तांदुळवाडी येथील रेल्वे अंडरपासचे कामे करतांना अपघात होणार नाही अशाप्रकारे वाहतुकीचे योग्य नियोजन करा. पावसाळ्यात पुलाच्या खाली पाणी साचणार नाही, वाहतुकीमुळे परिसरात नागरिकांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्या. पुलाच्या बाजुला सुरु असलेल्या सेवा रस्त्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करा.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीचे कामे करीत असतांना ग्रंथालयात पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कामे करावीत. इमारतीत अत्याधुनिक पद्धतीची करावी आणि पाणी वाचविणारी शौचालये, वॉशबेसिन, शॉवर बसवावीत. पायऱ्यावर कमी प्रमाणात धूळ बसणाऱ्या फरश्या बसवा. परिसरातील सेवा रस्त्याची कामे करा, असे निर्देश त्यांनी दिले.
बारामती बसस्थानक इमारत नूतनीकरणाची कामे करतांना नागरिकांना स्पष्ट दिसेल असे नामफलक लावा. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड करा. पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल, असे पेव्हर आणि फरश्या बसवा. बसस्थानक परिसर स्वच्छ राहील, याबाबत दक्षता घ्या,असेही श्री.पवार म्हणाले.
शादीखाना परिसराची कामे करीत असताना अल्पसंख्याक बांधवाना अधिकाधिक सुविधा मिळेल, यादृष्टीने परिसर सुशोभिकरणाची कामे करावीत. नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. वसंतराव पवार नाट्यगृहाचे कामे करतांना अत्याधुनिक दर्जाची साहित्याचा वापर करुन गतीने कामे करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
आगामी काळात परिसरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी शाळा, उद्यान, बगीचे, क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. इमारतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे तयार करावे. त्यामध्ये नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळतील याचा प्राधान्याने विचार करावा. विकास कामांकरीता माती वापरण्यापूर्वी त्याचे परीक्षण करा. वृक्ष लागवड करतांना व त्याचे संगोपन करतांना नगर परिषदेकडील खताचा वापर करा. परिसरातील बेघर नागरिकांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करुन देण्याबाबत नगरपरिषदेने विचार करावा. सार्वजनिक विकास कामे करतांना गाळेधारकांना तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसनाची व्यवस्था करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक विश्वास गायकवाड, बसस्थानक आगार प्रमुख वृषाली तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
00000