• Sat. Sep 21st, 2024
वकिला दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, घरात बांधून पाच तास छळ, नंतर खून करून मृतदेह विहिरीत टाकले

अहमदनगर : आर्थिक कारणावरून राहुरीतील वकील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता.राहुरी) यांचे अपहरण आणि नंतर निर्घृण खून करून आरोपींनी मृतदेह विहिरीत टाकले. पोलिसांनी या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी वकिलांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्यांच्यात घरात त्यांना दोरीने बांधून पाच ते सहा तास छळ केला. त्यानंतर गाडीमध्ये बसवुन त्यांना मानोरी गावाचे बाहेर घेवुन जावुन रात्रीचे सुमारास दोघांचे डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालुन त्यांचा श्वास गुदमरुन खुन केलेबाबत व त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीचे जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधुन टाकुन दिले, असे तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

या घटनेत पोलिसांनी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय ३२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी ), भैया उर्फ सागर साहेबराव खांदे ( रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर, शुभम संजीत महाडिक रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहमदनगर, यांना अटक केली आहे.
आढाव दाम्पत्य २५ जानेवारीला राहुरीच्या न्यायालय परिसरातून अचानक बेपत्ता झाले होते. आढाव नगरला गेले आणि एका पक्षकारामार्फत पत्नीही बोलावून घेतले असे सांगितले जात होते. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयित कारचा तपास केल्यावर घटनेचा उलगडा होत गेला.

अशी केली हत्या

ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला. आरोपींनी कट करुन वकिल दांम्पत्याला न्यायालयाच्या केसच्या कामासाठी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशींग याने स्वत:च्या गाडीत बसवून वकिल दांम्पत्यांला घरी घेऊन जाऊम त्यांच्याच घरामध्ये दोघांचे हात पाय बांधून ठेवले. त्यांच्याक़डे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली. परंतु आढाव यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच घरात त्यांचा पाच ते सहा तास छळ केला. त्यानंतर त्यांना वकील दांम्पत्याला गाडीत बसवू त्यांना मानोरी गावाचे बाहेर नेले.

रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टीक पिशव्या घालून दाबून ठेवले. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभुमीच्या जवळ असलेल्या विहीरीमध्ये दगड बांधून टाकुन दिले. त्यानंतर वकिल दांम्पत्याची गाडी राहुरीच्या न्यायालयाच्या परिसरामध्ये लावली. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढले. आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास करण्यात येत आहे. यातील आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याचेविरुध्द यापुर्वी खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed