• Mon. Nov 25th, 2024
    खान्देशातील अमळनेर तालुक्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

    निलेश पाटील, जळगाव : अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. पूज्य साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांचीही संमेलनात उपस्थिती राहणार आहे. संमेलनात पूज्य साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शन देखील भरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संमेलनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संमेलनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. १९५२ या वर्षी ज्या जागेवर साहित्य संमेलन झाले होते. तेथेच पुन्हा संमेलनाचे आयोजन होत आहे. तीन सभा मंडप, ३०० गाळे असलेले भव्य ग्रंथ दालन, खान्देशी खाद्यपदार्थांचे दालन, चित्र प्रदर्शन, सेल्फी पॉईंट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी पूर्ण होत आहे. साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रम दि. २९ जानेवारी पासून सुरु होत आहेत. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम, मराठी पाऊल पडते पुढे, आमची माणसं आमची संस्कृती, सूर तेचि छेडीता, अशी पाखरे येती या कार्यक्रमांचा समावेश असून अमळनेरसह खान्देशातील कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

    साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. वाडी संस्थान पासून ते संमेलन स्थळ असा दिंडी चा मार्ग असेल. दिंडीत चित्ररथ, ढोलताशा पथक, शालेय विद्यार्थी, मंगलवेश परिधान केलेले नागरिक, निमंत्रित साहित्यिक व साहित्यप्रेमी सहभागी होतील. खान्देशी संस्कृतीचा परिचय देणारी आकर्षक ग्रंथदिंडी व्हावी असा प्रयत्न सुरु असल्याचे डॉ.जोशी म्हणाले.

    संमेलनात साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवरील १२ परिसंवाद, निमंत्रितांचे ३ कविसंमेलन, ३ प्रकट मुलाखती, कथाकथन, परिचर्चा, लोकसंगीत, खान्देशी साहित्यिकांचे वैभव, अभिरुप न्यायालय, साहित्यिकांचे शताब्दीस्मरण या कार्यक्रमांचा समावेश आहे. तर दोन दिवस कविकट्टा एक दिवस गझल कट्टा, तीनही दिवस सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील संमेलनाचे आकर्षण असणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्वांना प्रवेश खुला असणार आहे.

    दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.३० यावेळेत कलानंद बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. बाल साहित्यिकांचे कथाकथन, काव्यवाचन, बालनाट्य, असे बालमेळाव्याचे स्वरुप असून मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, यासाठी मंडळाचे पदाधिकारी व शालेय विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन आवाहन करित असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभिप्राय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे व विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत.

    या स्पर्धेंच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व वाग्विभूती संस्थान, अमळनेर यांनी स्विकारले आहे. सर्वांचे सहकार्य व योगदानातून साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करत संमेलनात नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन म. वा. मंडळाने केले आहे. पत्रकार परिषदेला श्यामकांत भदाणे, बजरंग अग्रवाल, राजेंद्र भामरे, नरेंद्र निकुंभ, भैय्यासाहेब मगर, प्रदीप साळवी, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, प्रा. शीला पाटील, प्रा. डॉ. पी. बी. भराटे, संदीप घोरपडे, रमेश पवार, बन्सीलाल भागवत, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, दिनेश नाईक आदी उपस्थित होते.

    विशेष आकर्षण

    पूज्य साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांचीही संमेलनात उपस्थिती

    पूज्य साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्यांचे होणार प्रकाशन

    स्वतंत्र प्रकाशन कट्टयावर अनेक पुस्तकांचे प्रकाशन

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *