• Wed. Nov 27th, 2024
    मित्रांसोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थाचा पवना धरणात बुडून मृत्यू

    बंडू येवले, लोणावळा : कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थाचा पवना धरण परिसरातील ठाकुरसाई येथे पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, स्थानिक ग्रामस्थांची सतर्कता आणि धाडसामुळे एका तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

    मनिष शंकर शर्मा (वय-२०, रा.मुंबई) असे पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, आदित्य सचिन बुंदेले (वय-२०, रा. नागपूर) ह्या विद्यार्थ्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.

    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या लोणी प्रवरा येथील बाळासाहेब विखे पाटील मेडिकल कॉलेजचे १५ विद्यार्थी हे शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून मावळ व पवना धरण परिसरात फिरायला आले होते. सायंकाळी ते पवना धरण परिसरातील ठाकुरसाई येथे फिरायला गेल्यानंतर त्यापैकी चौघेजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. यावेळी मनिष आणि आदित्य यांना पोहताना येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच पोहताना त्यांची दमछाक झाल्याने ते दोघे बुडू लागले.

    तर इतर दोघे तत्काळ पाण्याबाहेर आले. दोघे बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा करून मदतीची याचना केली. यावेळी त्या परिसरातच सध्या राहणार लोणावळा व मूळचे ठाकुरसाईचे असलेले शिवदुर्ग मित्रचे सदस्य आकाश शांताराम मोरे व ठाकुरसाईचे सुनील भाऊ ठाकर यांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेत कशाचीही पर्वा न पाण्यात उडी मारुन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

    मात्र यामध्ये आदित्यला वाचविण्यात दोघांना यश आले मात्र मनिषला वाचविण्यात अपयश आले. ‌या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिस कर्मचारी विजय गाले, अमोल गवारे, होमगार्ड भिमराव वाळुंज, स्थानिक ग्रामस्थ दत्ता ठाकर व रवि ठाकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत आकाश मोरे व सुनील ठाकर यांच्या मदतीने अवघ्या अर्धा ते पाऊण तासात मनीषचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेची माहिती दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंब व नातेवाईकांना देण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed