सातारा, दि.26 : लढव्याचा, स्वातंत्र्य सैनिकांचा, उज्वल किर्ती प्राप्त करणाऱ्या वीर जवानांचा तसेच राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांचा हा सातारा जिल्हा आहे. याचा मला अभिमान असून राज्यात जिल्हा विकासाच्याबाबतीत अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस विभागाच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समिर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा जिल्हा असल्याने या जिल्ह्याकडे त्यांचे विशेष लक्ष असून विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. सातारा जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2023-24 करिता जिल्ह्यास एकूण रुपये 460 कोटी निधी प्राप्त असून आत्तापर्यंत एकूण 99% प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासकीय मंजुरी देण्यात राज्यामध्ये अव्वल स्थानी आहे. मिळालेला निधी शंभर टक्के खर्च करण्यावर जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील निवडलेल्या 49 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुपांतर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सन 2023-24 मध्ये 19 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण करण्यात येत आहेत. सन 2024-25 मध्ये 30 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुपांतर करणे प्रस्तावित आहे. २२३ केंद्रशाळातील एक शाळा आदर्श विकसित करावयाची असल्याने जिल्ह्याचा आदर्श शाळा विकसित करण्यासाठी रु. १५२ कोटी रकमेचा एकत्रित आराखडा आला आहे. त्यापैकी 77 कोटी रक्कम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून सन २०२४-२५ साठी प्रस्तावित आहे. जिल्हा परिषदेकडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर सारख्या इंग्रजीमाध्यमांप्रमाणे शिक्षण मिळणार आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
रस्ते, पर्यटन व जलसंपदा विभागाकडील रखडलेल्या प्रकल्पांना शासनाने गती दिली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. म्हणाले, काही कोयना प्रकल्पग्रस्तांचे जमिनी वाटपाचे प्रश्न प्रलंबीत आहेत. त्यांना जिल्ह्यातील जमिनी दाखवून पसंतीनुसार जमिनी वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, त्यांचे असलेले प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील. तसेच ज्याच्या त्यागातून प्रकल्प उभे राहत आहेत अशांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीबरोबर पुनर्वसन करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्ररेणेतून बांबू लागवड हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
कांदाटी खोऱ्याचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला सर्वती मदत केली जाईल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसाच संवर्धीत करण्यात येणार आहे. यासाठी 12 कोटी 35 लाखाची कामे हाती घेण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होईल व दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात येणार आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे चालू आहे. 1 हजार 556 योजनांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 6 लाख 17 हजार 982 नळ जोडणी पैकी 5 लाख 49 हजार इतके नळ कनेक्शन देण्यात आलेली आहे. उर्वरित नळ जोडण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 31 हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात आले असून या दवाखानांच्या माध्यमातून गोरगरीब जनेतला मोफत ओषधोपचार केले जात आहेत.
चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती
प्रजापिता ब्रहमकुमारी विश्व विद्यापीठ यांचे व्यसनमुक्ती व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल 108 हे या चित्ररथांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचालनाचे मुख्य आकर्षण ठरले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सन्मान
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व कृष्ण हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कराड यांना प्रोत्साहनपर प्रशस्ती पत्र देण्यात आले.
अटल भुजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित केलेल्या भुजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23 मध्ये माण मधील किरकसाल ग्रामपंचायतील प्रथक क्रमांक, खटाव तालुक्यातील निढळ ग्रामपंचायतीला द्वितीय तर मांडवे ग्रामपचायतींने तृतीय क्रमांक पटकविला आहे. या ग्रामपंचायतींचा सत्काराबरोबर अनुक्रमे 50, 30 व 20 लाखांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त अदिती स्वामीचा विशेष सत्कारही करण्यात आला. त्याचबरोबर सौरभ गायकवाड व सुदेष्णा शिवणकर, संस्कृती मोरे व नवनाथ बिडगर यांचा गुणवंत खेळाडू म्हणून सत्कार करण्यात आला. तर रोहन गुजर यांचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र स्टूडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांतर्गत विक्रांत पवार अरविंद गवळी महाविद्यालय, सुरज माने ज्ञानश्री इन्सटीट्यूट, सुजित वालेकर व तेजस घवणट शासकीय औद्योगिक महाविद्यालय, कराड, करण निगडे, शासकीय औद्योगिक महाविद्यालय, लोणंद, आरती झेंडे व पुजा माळवे कृष्णा विश्व विद्यापीठ, ओमकार मोरे व अविष्कार धनावडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाई, श्रुती चव्हाण शासकीय इंजीनियरींग महाविद्यालय, सातारा यांचाही पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी,, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गमिनीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000