• Mon. Nov 25th, 2024
    मुंबईतल्या किनारा मार्गाला वेग, पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार; कधी खुला होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान सध्या रस्ते मार्गाने प्रवास करताना गर्दीच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, प्रवासाला लागणारा पाऊण ते एक तासाचा अवधी आणि पर्यायाने होणारा मनस्ताप थांबण्याची चिन्हे आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक ते मरिन ड्राइव्हदरम्यानच्या मुंबई सागरी किनारा मार्गातील मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणारा पहिला टप्पा ९ फेब्रुवारीपर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. सध्या या मार्गाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा सेवेत आल्यास वाहनचालकांना पाऊण तासांचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत करणे शक्य होणार आहे. प्रतितास ८० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी या सागरी किनारा मार्गावर असेल. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधीच एक टप्पा खुला करण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.

    मुंबई सागरी किनारा मार्गाचा गुरुवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. मरिन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक असा १०.५८ किमी लांबीचा हा मार्ग आहे. मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला दुसरा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत सागरी किनारा मार्गाचे काम होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये वरळीच्या बिंदू माधव ठाकरे चौक ते मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या चार मार्गिका वाहनचालकांच्या सेवेत सुरू होतील. मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका सुरू केल्यानंतर बाजूच्याच अन्य मार्गिकांचे काम करताना येणाऱ्या समस्या पाहता पहिला टप्पा सकाळी आठ ते रात्री आठ या १२ तासांसाठीच सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. तर शनिवार आणि रविवारी मार्ग बंद ठेवला जाईल. पहिला टप्प्यात प्रियदर्शनी ते मरिन ड्राइव्हपर्यंत साडे तीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे. त्यामुळे वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार आहे. बोगद्यातून साधारण तीन चे चार मिनिटांत प्रवास पूर्ण होईल.

    मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान
    पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार

    प्रतितास ८० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी

    वाहनचालकांवर १००हून अधिक सीसीटीव्हींची नजर

    बोगद्यात वायुविजन प्रणाली

    बोगद्यामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. यामध्ये अग्निरोधक फायर बोर्ड तसेच बोगद्यांमध्ये वायुविजन प्रणाली आहे. त्यामुळे वायुविजनचा आणि हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. एका बोगद्यात आग लागली तरीही दुसरा बोगदा धूरमुक्त राहील. १०० मेगावॅट तीव्रतेच्या आगीत किमान तीन तास तग धरू शकेल, अशा पद्धतीने या बांधकामाची संपूर्ण रचना आहे. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी ३०० मीटरवर ११ छेद बोगदेही तयार केले आहेत.

    तूर्त टोल नाही

    मुंबई सागरी किनारा मार्गाचा पहिला टप्पा फेब्रुवारी खुला केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागण्याआधीच पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. पहिल्या टप्प्यात टोल असणार की नाही, असा प्रश्न असतानाच कोणताही टोल आकारला जाणार नसल्याचे सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली.

    शिवडी न्हावा शेवाला जोड

    एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी जोडरस्ता बांधण्यात येत आहे. हा जोडरस्ता झाल्यानंतर वरळीपासून सागरी किनारा मार्गाला अंडरपास करून जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवी मुंबईतून शिवडी न्हावा शेवामार्गे येऊन पुढे सागरी किनारा मार्गावरूनही जाता येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

    महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed