• Sat. Sep 21st, 2024
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान

नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकर्‍यांनी गुरुवारी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच केली आहे. रात्री उशिरा हजारोंच्या ताफ्यात मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईच्या सीमेवरील नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये शेवटच्या मुक्कामी होते. तर नवी मुंबई शहरात विविध मंडळांनी, मराठा समाजाच्या बांधवांनी जरांगे पाटील आणि दाखल झालेल्या आंदोलकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.
मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय
पनवेल ते नवी मुंबईकडे जाणार्‍या महामार्गावर ठिकठिकाणी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. २५ जानेवारी रोजी मराठा मोर्चा नवी मुंबई मध्ये दाखल झाला असून एपीएमसी बाजार आवारात आंदोलनकर्ते मुक्कामी होते. यासाठी बाजार समिती प्रशासनाने पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात सकाळपासूनच शुकशुकाट होता. तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांच्या जेवणासाठी सकाळपासूनच तयारी सुरु ठेवण्यात आली होती. नवी मुंबई मधील मराठा समाज बांधव तसेच माथाडी- मापाडी कामगारांद्वारे पाच ते सात लाख लोकांसाठी पाचही बाजार आवारात जेवणावळी मांडण्यात आली होती.

नवी मुंबई महापालिका देखील दिमतीला हजर होती. महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय सुविधा दिली होती. संध्याकाळी सात वाजल्यानंतर जरांगेंच्या ताफ्यातील ग्रामीन भागातून दाखल झालेली वाहनांनी नवी मुंबईकडे धाव घेतली. पनवेल ते वाशी असा येण्याचा मार्ग बदलून पामबीच मार्ग करण्यात आल्याने सर्वत्र गर्दी पहायला मिळाली. नवी मुंबईत मुख्यस्थळी ५ लाखांहून अधिक नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरा जरांगे यांचे नवी मुंबईत आगमन झाले.

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांसाठी डबेवाला संघटना पुढे सरसावली

पनवेल शहर प्रवेशद्वार कळंबोली, कामोठे, बेलापूर, वाशी तुर्भे मार्केट परिसर येथे आंदोनला समर्थन देत जरांगे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तर पाणी, जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अनेक ठिकाणी डिजे लावण्यात आले होते. लोणावळा येथे जरांगे पाटील आल्यानंतर त्यांना खोपोलीला येण्यासाठी तब्बल ८ ते ९ तास लागले. त्यांच्या समवेत ग्रामीण भागातील लहान मोठी वाहने घेऊन समाज बांधव होते. त्यामुळे खोपोली महामार्गावर २० ते २५ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed