‘आयडॉलच्या ‘एमएमएस’ अभ्यासक्रमासाठी ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्राची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यातील फायन्शिअल मॅनेजमेंट विषयाचा पेपर मंगळवारी होता. विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील केंद्रावर ही परीक्षा होणार होती. मात्र विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील फायन्शिअल अकाऊंट या विषयाचे प्रश्न देण्यात आले होते. हा प्रकार पाहून सर्वांचा गोंधळ उडाला. विद्यापीठाने आता परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले. मात्र नोकरी करणाऱ्यांना परीक्षेसाठी पुन्हा सुट्ट्या मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विद्यापीठाच्या या चुकीचा आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे’, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
‘परीक्षेसाठी तीन प्रश्नपत्रिकांचा संच तयार ठेवणे अपेक्षित असते. मात्र विद्यापीठाने केवळ एकच संच तयार केला होता. त्यातही चुका होत्या. या भोंगळ कारभारास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. ‘विद्यार्थी नोकरीधंदा करून शिक्षण घेत असतात. त्यांना परीक्षेसाठी सुट्ट्या मिळणे आधीच कठीण असते. त्यात या गोंधळाचा फटका त्यांना बसणार आहे’, असेही त्यांनी नमूद केले.
‘परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांचीच!’
याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता, ‘काही तांत्रिक कारणास्तव फायन्शिअल मॅनेजमेंट सत्र-२ऐवजी फायन्शिअल अकाऊंट सत्र-१ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर आयडॉलने या विषयाची दुसरी प्रश्नपत्रिका देण्याची तयारी सुरू केली. परंतु ही परीक्षाच पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. यानुसार ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा ११ फेब्रुवारीला घेण्यात येईल’, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News