• Sat. Sep 21st, 2024
रामदास आठवलेंची लोकसभेची तयारी, पण त्यांच्या दौऱ्याआधीच पदाधिकारी भिडले, दोन गटांत घमासान

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा दावा संधी मिळेल तेव्हा करीत आहेत. आता त्यांनी थेट तयारीही सुरू केली आहे. त्यासाठी ३ फेब्रुवारीला ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्याच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीतच पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांत घमासान रंगले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून हा वाद पेटला आहे. एवढेच नव्हे तर हा प्रकार पक्षाच्या घटनेशी सुसंगत नसल्याने निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा इशाराही एका गटाने दिला. त्यामुळे आता यात स्वत: आठवले यांनीच हस्तक्षेप केला असून दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना बुधवारी मुंबईला चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे.

आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी राहुरी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कर्जत तालुक्यातील संजय भैलूमे यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीवर आधीचे दक्षिण जिल्ह्याध्यक्ष सुनील साळवे यांनी आक्षेप घेतला. साळवे यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, निवडणूक निर्णय अधिकारी बी.के. बर्वे यांच्याकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीनंतर सुनील साळवे यांना मुंबईमध्ये रामदास आठवले यांनी तातडीने बोलावले आहे. असे सांगण्यात येत की, श्रीकांत भालेराव यांनीच २० ऑगस्ट २०२२ रोजी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीला राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी मान्यता दिली होती.

या कार्यकारीणीची मुदत संपलेली नसतानाच नवीन नियुक्ती केल्याने हा वाद पेटला आहे. संपर्कप्रमुख भालेराव मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. जिल्हाध्यक्ष पदावरील निर्णय पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचे सांगत याबाबत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची भूमिका सुनील साळवे यांनी जाहीर केली आहे. साळवे यांनी पक्षाच्या संपर्कप्रमुख आणि राज्य उपाध्यक्ष वाकचौरे यांच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिल्याने वरिष्ठ पातळीवरून तातडीने दखल घेत साळवे यांना बुधवारी मुंबईत चर्चेला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed