• Sun. Sep 22nd, 2024

मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

ByMH LIVE NEWS

Jan 23, 2024
मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि.२३ : मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले

फिरते दंत रुग्णालय हे शासनाच्या निधीतून झाले असून या रुग्णालयास जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर यांनीही सहकार्य केले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाचे लोकार्पण आणि या चिकित्सालयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन दंत वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भट, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख संध्या डॉ.चव्हाण यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नाविन्यपूर्ण आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज फिरते दंत रुग्णालय ‘स्टेट ऑफ आर्टस्’ या आधुनिक संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे थेट जनतेपर्यंत पोहोचवून आधुनिक सेवा प्रदान करणे सहज शक्य होईल.

प्राथमिक मौखिक आरोग्य सुविधा तसेच उत्तम उपचार  अधिकाधिक सुलभ करून फिरते दंत चिकित्सालयाद्वारे जनतेपर्यंत पोहोचून सेवेचा अभाव असलेल्या दुर्गम भागांमध्ये जास्तीत जास्त सेवा पुरवावी व मौखिक रोगांचे प्रमाण कमी करावे. तसेच जनतेस मौखिक आरोग्याबद्दल संवेदनशील करणे, तंबाखू व्यसनामुळे वाढणारे मौखिक कर्करोग यावर जनतेस जागरुक करून मौखिक कर्करोगावर नियंत्रण आणणे हे सामाजिक दंत शास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यांनी करावे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्ण्यालय, मुंबई  येथील सामाजिक दंत शास्त्र विभाग अधिक अधिक जनतेपर्यंत पोहोचून सेवा प्रदान करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

सुसज्ज फिरते दंत चिकित्सालयाची माहिती  

दंतचिकित्सालयात आधुनिक पद्धतीच्या दोन दंत खुर्च्या व यंत्रणा असून  रुग्ण सेवेसाठी तत्पर आहे. फक्त मौखिक तपासणी व उपचार या करिताच नव्हे, तर आधुनिक उपचार पद्धती यंत्रणा जसे की पोर्टेबल एक्सरे युनिट, कर्करोग तपासणी, त्वरित आरोग्य चाचणी सुविधा यांनी सुसज्ज आहे. ज्यामुळे रुग्णांचे जागीच निदान करून त्वरित उपचार सेवा देणे सोपे होईल. दातांची कीड यावर उपचार व प्रतिबंध, हिरड्यांचे आजार यावर उपचार, रूट कॅनॉल उपचार, मौखिक कर्करोग तपासणी, व्हीडिओद्वारे रुग्णांचे मौखिक आरोग्य संबंधित जागरूकता, तंबाखू व्यसन  समुपदेशन या सेवा पुरविल्या जातील.

यावेळी श्री.निवतकर, डॉ. पाखमोडे, डॉ. भट यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संध्या चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन अब्रार सय्यद यांनी केले, तर आभार प्रियांका मचाले यांनी मानले.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed