• Sun. Sep 22nd, 2024

कॅप्टिव्ह मार्केट योजना : साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

ByMH LIVE NEWS

Jan 23, 2024
कॅप्टिव्ह मार्केट योजना : साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.२३ : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी  ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे, अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात आज वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभागाची एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजनाबाबत आढावा बैठक वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर, उपसचिव कृष्ण पवार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली असून  राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ जवळपास २४ लाख ८० हजार ३८० कुटुबांना होणार आहे.

कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप होणार आहे. त्याचे वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी कालबद्ध नियोजन करून १ फेब्रुवारी २०२४ पासून साडी वाटप सुरू होईल आणि सर्वांना लाभ मिळेल, असे जिल्हानिहाय नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed