• Sat. Sep 21st, 2024

जागावाटपापूर्वी दावेदारीचा फड; लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस

जागावाटपापूर्वी दावेदारीचा फड; लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला किती जागा मिळणार याविषयीचा गुंता महायुती आणि महाविकास आघाडीत कायम आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे. आपली जागा पक्की असल्याचेही सांगितले जात असल्याने दावेदारीचा फड रंगला आहे. जाहीर मेळाव्यांमधूनही एकमेकांवर नेते टीका करीत असल्याने पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा यवतमाळात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्रात बंजारा समाजाची लोकसंख्या पाहता एक तरी बंजारा महिलेला उमेदवारी द्यायला हवी, अशी मागणी केली. इंद्रनील यांनी अप्रत्यक्षपणे पत्नी मोहिनी नाईक यांना पुढे केल्याचे बोलले जात आहे. मोहिनी यांचे माहेर गुजरातमधील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. हे पाहता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा पुसद परिसरात आहे. तर दुसरीकडे भावना गवळी यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठी आपल्याला फिरावे लागणार ही खंतही इंद्रनील यांना आहे. वाशीम लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव खासदार भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी केला होता. यानंतर मनोहरराव नाईक यांचा खासदार भावना गवळी यांनी पराभव केला होता. हे शल्य अजूनही नाईक घराण्याला आहे.

इंद्रनील यांच्या भाषणानंतर खा. गवळी या अधिकच आक्रमक झाल्या. ‘मेरी झाँसी नही दूंगी’ असे सांगत उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला. महायुतीमध्ये आपल्याशिवाय दुसरी कोण महिला, असा सवालही त्यांनी केला. पालकमंत्री संजय राठोड, त्यांची पत्नी किंवा मुलीला शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. राठोड लोकसभेत गेल्यास आपण दारव्हातून लढू, असेही खा. गवळ यांनी जाहीर केले. शिंदे गटात हे घडत असताना यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. आमदार मदन येरावार प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या १३ही खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देणार असल्याचे खासदार गवळी यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत.
वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…
काँग्रेस की ठाकरे गट?

महायुतीविरुद्ध काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्याने ठाकरे गट आग्रही आहे. खासदार अरविंद सावंत सातत्याने यवतमाळ-वाशीमचे दौरे करीत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांचा उत्साह वाढविला. माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईला आले असता माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, अशी मागणी केली. ठाकरे गटाकडे ही जागा गेल्यास आजच आपण गमावल्यासारखे होईल असे चेन्नीथला यांना पटवून दिल्याची माहिती आहे.

आज अमरावतीत विभागीय बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज, गुरुवारी अमरावतीत विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेस कार्यकर्ते यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची मागणी लावून धरणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed