• Sat. Sep 21st, 2024
शरद मोहोळ हत्या प्रकरण: आरोपींची एक ऑडिओ क्लिप हाती, मोठा मासा जाळ्यात अडकणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाच्या तांत्रिक तपासादरम्यान आरोपींची एक ऑडिओ क्लिप हाती लागली असून, त्यातून महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. मोहोळवर गोळ्या झाडणारा आरोपी पोळेकरच्या फोन कॉलची ही ऑडिओ क्लिप असून, त्यामध्ये अन्य काही जणांची नावे समोर आली आहेत. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

मोहोळ खून प्रकरणात आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

गोखले पुलाबाबत मोठी अपडेट, पुलाची एक मार्गिका फेब्रुवारीअखेर सेवेत? जाणून घ्या…
मोहोळच्या खुनाचा तपास करताना आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून, पौड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. मोहोळच्या खुनाच्या गुन्ह्यात चार शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यापैकी तीन शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून, उर्वरित एक हस्तगत करायचे आहे. ही शस्त्रे पुरविणाऱ्या प्रीतसिंग या आरोपीचा पोलिस पथके शोध घेत आहेत. आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांची नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली असून, त्यावेळी कोण हजर होते, यांचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम अटक केलेल्या सहा आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, तर कुरपे वगळता अन्य आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आय़ुक्त सुनील तांबे यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. केतन कदम, अॅड. हेमंत झंझाड, कीर्तीकुमार गुजर आणि राहुल भरेकर यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने पहिल्या सहा आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गणेश मारणेच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

या खून प्रकरणातील दुसरा सूत्रधार गणेश मारणे याचा गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. मुळशी परिसरासह अन्य शहरांमध्ये गुन्हे शाखेची पथके मारणेच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. आरोपी पोळेकर याने मोहोळच्या खुनानंतर कुरपे याला फोन करून या प्रकरणातील सूत्रधाराला निरोप द्यायला सांगितला होता. त्यानुसार, कुरपे याने एका व्यक्तीला फोनवर ही माहिती दिली. या संबंधित व्यक्तीला गुन्हे शाखेने बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते.

मुंबईतील सायनमध्ये वाहतुकीत मोठे बदल, कधीपासून वाहतूक बंद? ‘या’ मार्गांवर नो पार्किंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed