• Tue. Nov 26th, 2024

    ‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

    ByMH LIVE NEWS

    Jan 17, 2024
    ‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

    मुंबई, दि. १७ : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी येथील कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. ५० विविध ठिकाणावर ५० विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपण सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, फक्त एक वर्ष हा उपक्रम राबवून थांबणार नाही तर दरवर्षी मुंबई फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे “मुंबई फेस्टिवल 2024’च्या आयोजनाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, विझक्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबाज जोसेफ ,पर्यटन विभागाची राज्याची अॅम्बेसेडर ऑफ युथ टूरिझम नवेली देशमुख यावेळी उपस्थित होत्या. यावेळी मुंबई फेस्टिवलच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या  एसबीआई, साईनपोस्ट, एरिअन ग्रुप, इज माय ट्रीप, बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रोजेक्ट मुंबईचा या सर्व सहभागीदारांचा सत्कार करण्यात आला

    मंत्री,श्री महाजन म्हणाले, ‘मुंबई फेस्टिवल 2024’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून  सर्वांचा मुंबईकडे पाहण्याचा दृष्ट‍िकोन बदलेल. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाद्वारे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहअध्यक्षतेखाली सल्लागार समिती देखील काम करत आहे. या फेस्टिवलमध्ये अभूतपूर्व आणि अविस्मरणीय कार्यक्रम आहेत या कार्यक्रमात संगीत, पर्यटन परिषद, बीच फेस्टिवल, खाद्य महोत्सव, चित्रपट, विविध साहसी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या फेस्ट‍िवलमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.

    मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुंबई फेस्टिवल २०२४ ही सुरुवात आहे. फेस्टिवल मध्ये आणि नामवंतांचा  सहभाग आहे. फेस्टिवलच्या माध्यमातून आपण जगभरात पोहचू. मुंबई ची  एक वेगळी ओळख जगात आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, मुंबईची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जगासमोर येतील. मुंबईचे आकर्षण हे फक्त गेटवे ऑफ इंडिया पुरते मर्यादित नसून येथे असलेले सिद्धिविनायक मंदिर ते मुंबईची मेट्रो, विविध वास्तु यांचा संगम आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाला हातभार लागेल. मुंबईची संस्कृती जपण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया.

    पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, “महाराष्ट्र शासन आणि मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या सहकार्याने आपण मुंबई फेस्टीवल 2024 यशस्वीपणे करूया. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत मेहनत करणाऱ्या प्रत्येक सहभागी, भागीदार आणि सहयोगी यांचे मी मनापासून आभार मानते.जागतिक पातळीवर मुंबई फेस्टिवल पोहचवण्यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविला जाईल. राज्याची विविधता आणि संस्कृती याची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा फेस्टिवल मोलाची भूमिका बजावेल.

    मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “मुंबई फेस्टिवल २०२४’ मध्ये अनेक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक लहानातील लहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले गेले आहे. महाराष्ट्राच्या विविध पैलूंचे दर्शन या फेस्टिवलच्या माध्यमातून होईल. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी  आपण सर्वांनी सहभागी व्हावे, फक्त एक वर्ष महोत्सव करून थांबायचे नाही तर आज सुरू झालेला हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करुया.

    विझक्राफ्ट संस्थेचे संस्थापक सबाज जोसेफ यांनी फेस्टिवल मध्ये २० ते २८ जानेवारी रोजी दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली. या महोत्सवाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या वेळापत्रकासाठी, कृपया https://mumbai-festival.com/ ला भेट द्यावी किंवा इंस्टाग्राम @mumbai_festival वर आम्हाला फॉलो करावे.

    ‘मुंबई एक त्यौहार है’ हे मुंबई फेस्टिवल 2024 चे थीम साँग सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शित केलेले ही गीत, अतिशय लोकप्रिय झाले आहे. प्रत्येकजण याच्या तालावर थिरकत आहे. ‘मुंबई एक त्यौहार है हुकस्टेप चॅलेंज’ने सोशल मीडियावर धमाल केली आहे याबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

    मुंबई फेस्टिव्हल 2024′ मध्ये विविध कार्यक्रम

    ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे उद्घाटन दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते १० वाजता क्रॉस मैदान गार्डन, चर्चगेट येथे होणार आहे. तसेच एमएमआरडीए मैदान वांद्रे येथे महा एक्स्पोचे आयोजन केले असून दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘महा एक्सपो’चे उद्घाटन होणार आहे. हा ‘महा एक्सपो’ दिनांक २८ जानेवारी २०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत तर शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असेल.

    मुंबईतील विविध ठिकाणी दिनांक १९ ते २१ जानेवारी आणि २६ आणि २८ जानेवारी  रोजी शॉपिंग फेस्टचे आयोजन केलेले आहे. काळा घोडा येथे दिनांक २० ते २८ जानेवारी रोजी कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. बीच फेस्ट २० जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान असून यामध्ये योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप आणि स्क्रिनींग असे विविध उपक्रम जुहू चौपाटी येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित केले आहेत. सिनेमा फेस्ट दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान असून सायंकाळी ७ वाजता पीव्हीआर चित्रपट गृहांमध्ये मुंबईत विविध शोंचे आयोजन केलेले आहे. टुरिजम कॉनक्लेव्ह २४ जानेवारी रोजी कलिना येथील ग्रॅण्ड हयात येथे आयोजित केले असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे टुरिजम कॉनक्लेव्ह सुरू असेल. क्रिकेट क्लिनीक दिनांक २६ ते २८ जानेवारी दरम्यान सकाळी ७ ते रात्री ९ आणि रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ठाकूर क्रिकेट मैदान (कांदिवली पूर्व) येथे आयोजित केले आहे.

    टाटा मुंबई मॅरेथॉनचे दिनांक २१ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजन केले आहे.टर्बो स्टार्ट फॉरईव्हर प्लॅनेट चॅलेंज दिनांक २५ जानेवारी रोजी बीएसई फोर्ट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजता आयोजित केले आहे. पॅरामोटर शो दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गिरगाव चौपाटी येथे आयोजित केला आहे. म्युझिक फेस्ट दिनांक १९ ते २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विविध ठिकाणी आयोजित केले आहे. संगीत महोत्सवाचे महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजन केले आहे. समारोप कार्यक्रम दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील एमएमआरडीए मैदान येथे आयोजित केला आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी  https://mumbai-festival.com/ या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

    ****

    संध्या गरवारे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed