• Mon. Nov 25th, 2024

    गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Jan 17, 2024
    गोरेगाव फिल्मसिटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई दि. 17 :- गोरेगाव येथील फिल्मसिटी व बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वन, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे इलेक्ट्रीक गाड्या व बग्गीचे आणि व्याघ्रसफारीचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास खासदार गोपल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार विलास पोतनीस, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनिल राणे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, पर्यटक, नागरिक उपस्थित होते.

    वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वनासंबधी असलेला संकल्प व अज्ञावलीचे अनुपालन होणे गरजेचे आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण अभियानामुळे राज्यात वनक्षेत्र वाढत आहे हे वन विभागाबरोबरच राज्यातील जनतेचे यश आहे. आईच्या सेवेप्रमाणे वनराईची सेवाही अनमोल आहे. वन संवर्धनाची कामे मिशन मोडवर करण्यासाठीं आणि वन क्षेत्राच्या विकासाचा गोवर्धन  उचलण्यास आपण सर्वांनी सहभागी होऊया, असे आवाहनही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शहराच्या मध्यवर्ती भागात आहे याचा अभिमान असल्याचे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले या परिसरातील विकास कामे करण्यास प्राधान्य देण्यात येऊन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. वन विभागाशी असलेले प्रश्न सोडवण्यासाठी गठित केलेल्या  समित्यांनी बैठका घेऊन याबतचे प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावेत. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील.

    खासदार श्री. शेट्टी म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी अधिकचा निधी मिळावा. पर्यटकांसाठी होत असलेल्या कामांबरोबरच स्थानिकांनाही येथे रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत असलेल्या विविध कामांमुळे उद्यानात अधिक जिवंतपणा आला असल्याचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणाऱ्या रहेजा वसाहती संदर्भातील प्रश्न वन विभागाने प्राधान्याने सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    प्रधान सचिव श्री. रेड्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा १६ जानेवारी हा स्थापना दिवस असून या दिनाच्या निमित्ताने बॅटरीवर चालणाऱ्या ६ बस व विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या ५ बग्गीचे लोकार्पण झाल्याने याचा लाभ पर्यटकांना होणार आहे. तसेच व्याघ्रसफारी सुरू झाल्याने या उद्यानात मुक्त संचार करणारा वाघ पर्यटकांना पहावयास मिळणार आहे.

    कार्यक्रमात वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी आभार मानले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed