• Sat. Sep 21st, 2024
महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार; यंदाच्या हंगामाबाबत ‘विस्मा’चा अंदाज, काय कारण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान बिगरमोसमी पाऊस झाल्याने ऊसाची उत्पादकता आणि साखर उताऱ्यामध्ये वाढ होण्याचा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) वर्तविला आहे. हंगामाच्या पूर्वी ८८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. त्यात आता १० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. ‘इथेनॉल’सह अन्य उपपदार्थाची निर्मिती वगळून एकूण साखर उत्पादनात ७.५ टक्के वाढ होऊन राज्यात चालू हंगामातील साखर उत्पादन ९५ लाख टन होईल, असे ‘विस्मा’चे म्हणणे आहे.

कारखानिहाय आढावा

विस्माच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या ३१ डिसेंबर २०२३ अखेर झालेले प्रत्यक्ष व अपेक्षित गाळप, साखर उत्पादन व साखर उताऱ्याचा कारखानानिहाय आढावा घेण्यात आला. राज्यात सध्या ९६ सहकारी व ९९ खासगी असे एकूण १९५ साखर कारखाने गाळप करीत आहेत. त्यांची गाळपक्षमता नऊ लाख टन प्रतिदिन आहे.

पुनर्विचार करण्याची गरज

राज्याचा गळीत हंगाम अंदाजे ९० ते १०० दिवसांचा अपेक्षित होता. डिसेंबरअखेर एकूण ९४६ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज होता. या अंदाजात पाच टक्के वाढ होऊन ९९३ लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हंगाम सुरू झाल्यापासून ६० दिवसांत डिसेंबरअखेर ४२८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ३८.२० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. अद्याप ५६५ लाख टन गाळप बाकी आहे. बिगरमोसमी पावसामुळे प्रतिहेक्टरी ऊसाच्या उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होईल, असे ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीस घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळ बंधूंना नोटीस, ‘गिसाका’ साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज थकल्याने जिल्हा बॅंकेची कारवाई
देशात मुबलक साखर

डिसेंबरअखेर ४० टक्के ऊस गाळपातून ३८ लाख टन साखर उत्पादन झाले असल्याने उर्वरित ६० टक्के ऊस गाळपातून एकूण ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज विस्माने वर्तविला आहे. हंगामाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ८८ लाख टन निव्वळ साखरेच्या उत्पादनाचा अंदाज साखर आयुक्तालय व साखर संघाने व्यक्त केला होता.

कर्नाटक, गुजरातमध्येही वाढ

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक व गुजरातमध्येही अवकाळी पाऊस झाल्याने त्याही राज्यांमध्ये ऊसाच्या प्रतिहेक्टरी उत्पादनात आठ ते १० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांत देशातील एकूण साखर उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन होते. देशांतर्गत वापरासाठी २७५ ते २८० लाख टन साखर लागते. या वर्षीचे अपेक्षित साखर उत्पादन ३२० लाख टन होणार असल्याने मुबलक साखर उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed