चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघांसाठी काँग्रेसची चाचपणी सुरु झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकंडून अर्ज मागविले होते. या मतदारसंघासाठी काँग्रेस मध्ये आठजण इच्छुक आहेत.
चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे तथा शिवा राव यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व वरोरा येथील डॉ. हेमंत खापने यांनी उमेदवारीसाठी अर्ज दिलेत. या आठही इच्छुकांचे अर्ज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
सलग दहा वर्ष भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे परत आणण्याचा दिव्य पराक्रम दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी केला. विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एक केलं, जातीय समीकरणे जुळवून आणली. त्याचा सकारात्मक परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही दिसून आला. वरोरा-भद्रावती मतदार संघात खासदार धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला. मागील काही महिन्यांपूर्वी खासदार धानोरकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे हा मतदार संघ पोरका झाला. खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं कार्य प्रतिभा धानोरकर यांनी केलं. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्याबाबत मोठी सहानुभूती आहे. ही सहानुभूती मतदानात रुपांतरित होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र आता पक्षातील सात जणांनी लोकसभेच्या या जागेवर दावा केल्याने ही जागा मिळविण्यासाठी पक्षात सुरु असलेली स्पर्धा भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचवेळी काँग्रेससाठी मारक ठरणारी आहे.
दोन जिल्ह्यातील मतदार ठरवितात खासदार
चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी असे सहा मतदारसंघ येतात. यातील वणी आणि आर्णी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. चंद्रपूरमधून अपक्ष किशोर जोरगेवार, राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार तर वरोरा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तसेच वणी मतदारसंघातून भाजपचे संजीव बोदकुलकर आणि आर्णीमधून याच पक्षाचे डॉ. संदीप धुर्वे हे निवडून आले आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी हे मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाशी जोडले. या दोन्ही जिल्ह्यातील मतदार प्रामुख्याने खासदार ठरवित असतात.