• Fri. Nov 29th, 2024

    अवयवदानात महाराष्ट्रातील हा जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी, दुसरा नंबर कोणाचा?

    अवयवदानात महाराष्ट्रातील हा जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी, दुसरा नंबर कोणाचा?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात मंदावलेल्या मरणोत्तर अवयवदान प्रक्रियेने वेग घेतला असून, राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. राज्यात गेल्या वर्षी १४८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. पैकी सर्वाधिक ५८ अवयवदान पुणे विभागात नोंदवले. त्यामुळे १५८ रुग्णांना अवयव प्राप्त झाले आहेत. पुणे विभागात गेल्या तीन वर्षांपासून मरणोत्तर अवयवदानात वाढ होत आहे.

    मुंबई दुसऱ्या स्थानी

    अवयवदानात दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि तिसऱ्या स्थानी नागपूर विभाग आहे. सर्वांत कमी अवयवदान छत्रपती संभाजीनगर विभागात झाले. गेल्या काही वर्षांमध्ये अवयव प्राप्त होण्यासाठीच्या प्रतीक्षा यादीमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. गरजेच्या तुलनेत अवयव उपलब्ध होत नसल्याने सर्वच स्तरांतून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

    जनजागृतीमुळे संख्येत वाढ

    जनजागृतीमुळे करोनानंतर मरणोत्तर अवयवदानाची संख्या वाढल्याचे दिसत आहे. पुणे विभागात २०२१मध्ये ४४ मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्णांचे अवयवदान झाले. त्यातून ९७ रुग्णांना विविध अवयव प्राप्त झाले. सन २०२२मध्ये ४६ मेंदूमृत रुग्णांच्या अवयवदानातून ११८ रुग्णांना जीवनदान मिळाले. गेल्या वर्षी, २०२३ मध्ये ५८ जणांच्या अवयवदानातून १५८ रुग्णांना अवयव प्राप्त झाल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) दिली.
    तुम्हाला माहितेय का, सध्या भारतात किती लोक करोडपती आहेत? २०२५मध्ये आकडा वाढणार, कारण…
    विभागानुसार अवयवदान
    विभाग संख्या
    पुणे ५८
    मुंबई ४९
    नागपूर ३५
    छत्रपती संभाजीनगर ६

    पुणे विभागातील प्रतीक्षा यादी

    मूत्रपिंड १६३०
    यकृत ६००
    हृदय ४५

    मूत्रपिंडासाठी सर्वाधिक प्रतीक्षा

    सद्यस्थितीत पुणे विभागातील १६३० रुग्ण मूत्रपिंडाच्या (किडनी) प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक प्रत्यारोपणही मूत्रपिंड या अवयवाचे झाले आहे. हृदयाच्या प्रतीक्षेत ४५ रुग्ण आहेत. हृदय प्रत्यारोपणाची सुविधा सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. पुणे विभागात गेल्या तीन वर्षांत हृदय प्रत्यारोपणाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed