• Sun. Sep 22nd, 2024
चिमुकला पतंग उडवत होता; अचानक तारांचा स्पर्श, बालक होरपळला, पाय कापावा लागला

नागपूर: संक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला उधाण आले असताना निष्काळजीपणामुळे दुर्घटनाही पुढे येऊ लागल्या आहेत. समतानगर येथे अशीच घटना घडली. पतंग उडवताना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीररीत्या भाजला. त्यानंतर त्याचा एक पाय कापावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर येथे राहणारा हा मुलगा बुधवारी सायंकाळी गच्चीवर पतंग उडवत होता. त्यात तो इतका तल्लीन झाला की त्याचवेळी इमारतीजवळून जाणाऱ्या विजेच्या तारांचेही त्याला भान राहिले नाही. त्या जिवंत तारांचा स्पर्श होऊन तो गंभीररीत्या भाजला. त्याच्या मानेपासून शरीराचा खालचा भाग पूर्णपणे भाजला होता. जखमा इतक्या खोल होत्या की हात व पायाची हाडे दिसायला लागली होती. कुटुंबीयानी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आणले.
मनपाची १४० कोटी रुपयांची जागा हडपली; दहा जणांवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं प्रकरण…
या दुर्घटनेत त्या मुलाचे दोन्ही हात व दोन्ही पाय निकामी झाल्याचे तपासणीत आढळून आले. याबाबत कळताच स्वत: बालरोगतज्ज्ञ असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे तसेच साहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अक्षय सज्जनवार यांनी या रुग्णाकडे धाव घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. नेहा गुप्ता व पेडियाट्रिक सर्जन डॉ. राजेंद्र सावजी यांच्याशी चर्चा करून उपचार सुरू करण्यात आले. दुर्दैवाने गुरुवारी झालेल्या शस्त्रक्रियेत या मुलाचा एक पाय कापावा लागला.

६० टक्के भाजलेल्या या बालकाला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया व औषधोपचार पूर्णपणे नि:शुल्क करण्यात येत आहे. तसेच, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे संबंधित वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर याकडे विशेष लक्ष देत आहेत. सध्या सर्वत्र पतंगीचा माहोल सुरू झाला आहे. पतंग उडवताना दरवर्षीच अशा घटना घडतात. त्यामुळे विशेषत: लहान मुलांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.

‘सत्यशोधक’ चित्रपटात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही, उत्तम पद्धतीने साकारलेला चित्रपट : शरद पवार

ही खबरदारी घ्या
-पतंग मोकळ्या मैदानात उडवा.
-विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग व मांजा काढण्याचा प्रयत्न करू नका.
-विजेच्या डीपीवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नका.
-पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नका.
-धातुमिश्रित मांजाचा वापर टाळावा. हा मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.
– कटलेली पतंग पकडण्यासाठी रस्त्याने धावू नये, अपघातची शक्यता असते.
– फक्त सुती धाग्याने बनवलेला मांजा वापरावा.
– पतंग उडवताना त्याच्या ताराने ओरखडे किंवा दुखापत झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
– पतंग उडवताना हातमोजे घाला, जेणेकरून त्यावर ओरखडे पडणार नाहीत.
– पतंगीच्या धाग्याने कोणत्याही पक्ष्याला इजा होणार नाही, याची काळजी घ्या.
– रस्त्यावर पतंग उडवू नका, यामुळे तुम्हाला अपघाताचा धोका आहे, अन्यथा धाग्यात अडकल्याने दुचाकीस्वाराचा तोल बिघडू शकतो.
– कापलेली पतंग लुटताना अनेकजण आकाशाकडे पाहतात. अशा स्थितीत लोकांचा पाय खालच्या कठीण वस्तूवर आदळतो, हे टाळा.

संक्रांतीचा उत्साह मोठा आहे. या काळात पतंग उडविणे, ही परंपरा आहे. ती पाळलीच गेली पाहिजे. मात्र, ही बाब आपल्या व इतरांच्या जिवावर बेतू नये, याचीही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जीव मोलाचा आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. प्रशासनानेही याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed