• Mon. Nov 25th, 2024
    महायुतीमध्ये बेबनाव, कोणत्या चिन्हावर लोकसभा लढायची? ‘प्रेस’मध्येच कलगीतुरा!

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : महायुतीच्या वतीने येत्या १४ तारखेला कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आज महायुतीची समन्वय पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे देखील नेते उपस्थित होते. यावेळी तीनही पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी आमच्याच पक्षाला मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तर कमळाच्या चिन्हावर लोकसभेचा उमेदवार असेल असे भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांनी ठासून सांगितले. याला विरोध करत राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आमचा उमेदवार घड्याळ या चिन्हावर असेल असे म्हणाले. यामुळे राज्यपातळीवर ज्याप्रमाणे महायुती नेत्यांमध्ये समन्वय झाला असला तरी जिल्हा पातळी मात्र अद्यापही बेबनाव दिसत आहे.

    या पत्रकार परिषदेला भाजपच्या लोकसभा समन्वयक आमदार मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी, राष्ट्रवादीचे लोकसभा समन्वयक राजेश विटेकर, शिवसेनेचे लोकसभा समन्वयक हरिभाऊ लहाने, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष माधव कदम हे प्रमुख उपस्थित होते.

    दुर्राणी म्हणाले घड्याळ-घड्याळ, बोर्डीकर म्हणाले कमळ कमळ…!

    महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले सध्या देशामध्ये मोदींची जादू आहे. देशातील जवळपास ६० टक्के जनता ही मोदींच्या नावे मतदान करत आहे. त्यामुळे कमळ या चिन्हावर जर उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला निवडून यायला सोपे जाईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणता जरी असला तरी तो कमळ या चिन्हावर उभा असला पाहिजे. यासाठी आम्ही आणि भारतीय जनता पक्ष दोघेही आग्रही असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचा मुद्दा खोडत जर परभणी लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तर आम्ही घड्याळ या चिन्हावर आमचा उमेदवार उभा करणार असल्याची ठाम भूमिका मांडली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मागील लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढला होता आणि केवळ चाळीस हजार मताच्या फरकाने पराभूत झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार हा घड्याळ या चिन्हावरच लढणार.

    तर समारोप करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे म्हणाले की परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आत्तापर्यंत मागील २५ वर्षापासून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर येथील खासदार निवडून येत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि तो धनुष्यबाण या चिन्हावरच लढेल, अशी त्यांनी भूमिका मांडली.

    परभणी लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्यावतीने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देखील दावा ठोकला आहे. त्याचबरोबर आपल्याच पक्षाच्या चिन्हावर आपला उमेदवार लढेल असा दावाही संबंधित नेत्यांनी केला. त्यामुळे महायुतीमध्ये नक्की परभणीची जागा कुणाला जाते? आणि कोणता उमेदवार कोणत्या चिन्हावर लढतो हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी जिल्ह्यातील महायुतीचे नेते मात्र आपल्या आपल्या पक्षाचे घोडे दामटत असल्याचे दिसून येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed