• Mon. Nov 25th, 2024
    शिवसेना कुणाची ठरविणारे हे कोण टिकोजीराव? ठाकरेंचा हल्लाबोल, सुप्रीम कोर्टाला मोठी विनंती

    मुंबई : आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर केलंय. भविष्यातील मार्ग त्यांनी मोकळा केला. सगळे नियम धाब्यावर बसून नार्वेकरांनी निर्णय दिला. आमच्यामागे महाशक्ती आहे, सुप्रीम कोर्टालाही आम्ही जुमाणनार नाही, असंच त्यांनी दाखवून दिलं. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. नार्वेकर यांनी आपल्या पदाचा, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे? त्यांना अपात्र का केलं नाही? असा सवाल ठाकरेंनी विचारला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असंही ठाकरेंनी सांगितलं.

    ज्या पक्षाची स्थापना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली, तो पक्ष कुणाचा हे ठरविणारे हे कोण टिकोजीराव? लहान मुलाला विचारलं तर तो ही सांगेल की शिवसेना कुणाची? मुळात शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. त्याच निवडणूक आयोगाच्या निर्णयाला धरून नार्वेकरांनी आजचा निर्णय दिलाय, असं म्हणत ठाकरेंनी नार्वेकरांवर हल्ला चढवला. त्याचवेळी आपल्या बापाचा चेहरा वापरून आपल्याला कुणी मतदान देणार नाही, हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी दुसऱ्याच्या बापाचा राजकीय पक्ष पळवला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.

    राहुल नार्वेकर यांचा मुख्य निकाल काय?

    पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

    त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे आमदार भरत गोगावले यांचा व्हिपही राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवला आहे.

    दुसरीकडे एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरवत २१ जून २०२२ ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही. तसेच सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली.

    त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व्हिप भरत गोगावले यांचा पक्षादेश ठाकरे गटाला किंबहुना ठाकरे गटातील सदस्यांना दिला असल्याचे पुरावे शिंदे गट सादर करू न शकल्याने त्यांची याचिका फेटाळून लावत असल्याचं सांगत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed