• Sat. Sep 21st, 2024

मालदीवपेक्षा कोकणच सर्वांगसुंदर, देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टची चर्चा

मालदीवपेक्षा कोकणच सर्वांगसुंदर, देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टची चर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: ‘हे मालदीव नाही! महाराष्ट्राला लाभलेले आपले सुंदर कोकण आहे!’, अशी सचित्र पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबाबत अवमानजनक टिप्पणी केल्याबद्दल मालदीवविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेच्या निमित्ताने केलेल्या त्यांच्या या पोस्टमुळे कोकणच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली आहे. याच मोहिमेत अनेक सेलिब्रिटींनी ‘एक्स’सह अन्य सामाजिक माध्यमांवर देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनारे व बेटांची छायाचित्रे पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

पर्यटकांना भुरळ पाडणारा स्वच्छ, सुंदर व निळाशार समुद्रकिनारा कोकणाला लाभला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, मालवण, आचरा, निवती, भोगवे हे समुद्रकिनारे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. कोकणातील या निसर्गसंपदेची छायाचित्रे पोस्ट करून फडणवीस यांनी कोकणच्या पर्यटनक्षेत्रात उत्साह निर्माण केल्याची चर्चा या भागात सुरू झाली आहे. त्यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे भोगवे समुद्रकिनाऱ्याची असल्याचे समोर आले आहेत. ‘कोकणाला भेट देणे चुकवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला ते भारतातील पहिले एकात्मिक स्कूबा डायव्हिंग स्कूल, एमटीडीसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्सचे स्थापत्य सर्वोत्तम कलेच्या उदाहरणांपैकी एक असून ते पाहून मंत्रमुग्ध व्हा’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

चित्रीकरण रद्द करण्याची तयारी

चित्रपट व जाहिरातींसाठी अनेक जण मालदीवमध्ये चित्रीकरण करतात. मात्र, तेथील मंत्र्यांच्या वक्तव्यांनंतर असे नियोजित चित्रीकरण रद्द करण्याची तयारी अनेक एजन्सींनी सुरू केली आहे. अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे हिनेदेखील मालदीवमधील नियोजित चित्रीकरण रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच यापुढे मालदीवला कधीच जाणार नसल्याचे तिने सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

‘एक्स्प्लोरइंडियनआयलंड्स’ जोरात

भारतीयांकडून मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकला जात असतानाच आपल्या देशातील अनेक पर्यटनस्थळे त्याहून नितांत सुंदर असल्याचे सिद्ध करण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याअंतर्गत ‘एक्स’वरील हॅशटॅग ‘एक्स्प्लोरइंडियनआयलंड्स’ मोहिमेत अनेक सेलिब्रिटींनी देशातील सुंदर समुद्रकिनारे पोस्ट केले आहेत. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अंदमान, पुडूच्चेरी, उडुपी येथील समुद्रकिनारे व बेटांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. तर, अभिनेता आर. माधवनने अंदमान बेटे, जॉन अब्राहमने लक्षद्वीप येथील उत्तम आदरतिथ्य, वरुण धवनने लक्षद्वीप येथील किनारे आणि रणदीप हुडाने अंदमान-निकोबार बेटांच्या सौंदर्याचा दाखला दिला आहे.

बीग बीसुद्धा यांचा आत्मनिर्भतेचा नारा

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी वीरेंद्र सेहवागच्या ‘एक्स’ला प्रतिसाद देत लक्षद्वीप व अंदमान येथील निसर्गसौंदर्य आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. तेथील अद्भूत समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव अविश्वसनीय असतो, असे सांगत ‘आम्ही भारत आहोत, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आमच्या आत्मनिर्भरतेवर घाला घालू नका’, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

मराठी कलावंतांचे ‘चला कोकण’

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ‘एक्स’सह इन्स्टाग्रामवर कोकणातील भोगवे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य व तेथे क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर, माजी मंत्री व भाजपचे नेते विनोद तावडे यांनी वेंगुर्ल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. हॅशटॅग ‘एक्स्प्लोरइंडियनआयलंड्स’अंतर्गत हॅशटॅग ‘कोकण’ही ‘एक्स’वर जोरात सुरू आहे.

कधी होतं गुजरातींचं राज्य, मग कसा बनला एक मुस्लिम देश? जाणून घ्या मालदीवबाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed