• Sat. Sep 21st, 2024

ठाणे पोलिसांची अनोखी आयडिया, सायकलवरुन घालणार गस्त, कारण आहे इंटरेस्टिंग

ठाणे पोलिसांची अनोखी आयडिया, सायकलवरुन घालणार गस्त, कारण आहे इंटरेस्टिंग

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : दाटीवाटीच्या गल्ल्या, चिंचोळे रस्ते आणि नेहमी वाहतूककोंडीने ग्रासलेल्या ठाणे शहरातील नौपाडा परिसरात पोलिसांकडून आता चक्क सायकलवरून गस्त घातली जाणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील हा पहिलाच उपक्रम असून या ‘बायसिकल पेट्रोलिंग’मुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य राखणे अधिक सोपे होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पोलिस वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने चार सायकलींच्या माध्यमातून ही अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात या सायकलींच्या संख्येत वाढ केली जाणार असून भविष्यात शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायकलवरून गस्तीचा उपक्रम राबवला जाण्याची शक्यता आहे. ठाणेकरांना या उपक्रमाद्वारे पाहता येण्याची शक्यता आहे.

मुंबई-वसईत समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी घोड्यावरून तर मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर सेगवेज सायकल अर्थात दोन यांत्रिकी चाकावरून पोलिसांची गस्त सुरू असते. ठाण्यातही सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत चारचाकी आणि दुचाकीवरून पोलिसांची गस्त सुरू आहे, मात्र नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोखले रोड, राम मारुती रोड, गावदेवी चौक नेहमी गजबजलेले असतात. याठिकाणी गस्तीसाठी दुचाकीवर फिरताना अडचणी येतात. पाचपाखाडी येथील हरित पथ परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी येतात. या भागातही पायी पेट्रोलिंग केले जाते. मात्र टीवाटीच्या तसेच काहीशा मोकळ्या असणाऱ्या नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील भागात सायकलवरून गस्त केल्यास पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचतील. तसेच अरुंद रस्ते आणि गल्ल्यांमधून वाट काढणे सहजसाध्य होईल, या संकल्पनेतून नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी ‘बायसिकल पेट्रोलिंग’ ही संकल्पना मांडली. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा रविवारी शुभारंभ झाला. ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस ठाणे व आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते गस्तीसाठी आणलेल्या सायकलचे अनावरण करण्यात आले.
नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल
पोलिस कर्मचारीही रॅलीत सहभागी

सायकल रॅलीमध्ये सहा वर्षांच्या चिमुकल्यापासून ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल १०७ हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, या रॅलीत पोलिस उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीदेखील सहभाग घेतला.

सायकल चोरीच्या तक्रारींकडे विशेष लक्ष

सायकल चोरीचे प्रमाण शहरात वाढत असताना त्या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास अडचणी येतात. याकडे संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी याप्रसंगी लक्ष वेधले. तर या तक्रारींची नोंद तत्काळ घेतली जाईल, अशी ग्वाहीही उपायुक्त गावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed